मनोरंजनसृष्टीतून नुकतीच एक दु:खद बातमी समोर येत आहे. छत्तीसगडमधील अभिनेते सूरज मेहर यांच्या निधनाच्या वृत्तामुळे सध्या कलाविश्वात शोकाकुल वातावरण आहे. नारद मेहर या नावाने ओळखला जाणारा सूरज त्याच्या ‘आखरी फैसला’ या चित्रपटासाठी शूटिंग करत होता. बुधवारी या चित्रपटाचे शूटिंग आटोपून घरी जात असताना वाटेत त्यांचा एक भीषण अपघात झाला आणि या अपघातात त्यांना आपला जीव गमवावा लागल्याचे समोर येत आहे.
९ एप्रिल रोजी रात्री उशिरा शूटिंगवरून घरी जात असताना त्यांच्या कारची व एका ट्रकची जोरदार धडक झाली. छत्तीसगडमधील सरसिवा पोलीस स्टेशन हद्दीतील पिपरदुला गावाजवळ ही घटना घडली. हा अपघात इतका भीषण होता की, त्यांच्या कारचे अक्षरश: तुकडे-तुकडे झाले आणि या भीषण अपघातात अभिनेता जागीच ठार झाला. या घटनेनंतर सरसिवा पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि अपघातात अडकलेल्या लोकांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी सूरज यांना मृत घोषित केले.

सूरज यांच्या निधनाच्या वृत्ताने मनोरंजनसृष्टीतएकच शोककळा पसरली आहे. हा अपघात झाला त्यादिवशीच सूरज यांचा साखरपुडा असल्याचे वृत्तही समोर येत आहे. तसेच मृत अभिनेता (सूरज मेहर) हा त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. सुरजच्या मृत्यूमुळे छलिवुडसह त्याच्या गावात शोककळा पसरली आहे. एका उभरत्या कलाकाराचे अपघाती निधन हे छत्तीसगड चित्रपटसृष्टीचे मोठे नुकसान असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, काल (१० एप्रिल) रोजी त्यांचा साखरपुडा होणार होता. ओडिशातील भाटली येथे साखरपुडा पार पडणार होता. त्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. पण अभिनेत्याच्या अपघाती निधनाच्या वृत्ताने आनंदाचे रूपांतर दु:खात झाले. त्यांच्या निधनाच्या वृत्तावर कलाविश्वातील अनेक कलाकारांनी शोकही व्यक्त केला आहे.