सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत अभिनेत्री भार्गवी चिरमुले हिचं नाव आवर्जून घेतलं जातं. भार्गवीने आजवर अनेक मालिका, चित्रपटांमधून महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. ‘वहिनी साहेब’ या मालिकेतील भूमिकेने अभिनेत्रीला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. अभिनयशिवाय भार्गवी उत्कृष्ट नृत्यांगना आहे. तिने स्वतःचं युट्यूब चॅनेलही सुरु केलं असून ते उत्तम सुरु आहे. अभिनेत्री बरेचदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिली. (Prasad Khandekar On Bhargavi Chirmuley Birthday)
भार्गवीने सिनेसृष्टीत काम करत असताना बऱ्याच कलाकारांसह मैत्री केली. आज भार्गवीच्या वाढदिवसानिमित्त अभिनेता प्रसाद खांडेकरने केलेल्या पोस्टची चर्चा रंगली आहे. भार्गवीबरोबरचा फोटो शेअर करत अभिनेत्याने इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिला शुभेच्छा दिल्या आहेत. प्रसादही नेहमीच सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतो. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून तो नेहमीच प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतो. अशातच प्रसादने हटके कॅप्शन देत भार्गवीला दिलेल्या शुभेच्छा साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.
ही पोस्ट शेअर करत प्रसादने शुभेच्छा देत म्हटलं आहे की, “दहा ते दहाची शिफ्ट ज्यावेळी काही कारणास्तव पहाटे ५ला संपते. त्यावेळी ही एवढे उत्साही आणि सहकार्य करणारे आर्टिस्ट फारच कमी असतात, त्यापैकी एक भार्गवी तू आहेस. खूपच गोड व्यक्ती आणि कमाल अभिनेत्री आहेस. तसेच सुंदर नृत्यांगणाही आहेस. आता तर पॉडकास्टपण जोरात चाललाय बाबा. वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा मैत्रिणी”.
प्रसादने कॅप्शनमध्ये भार्गवीची केलेली स्तुती आणि कौतुक अगदी खरं आहे. भार्गवी मुळातच खूप मेहनती अभिनेत्री असून ती तिच्या मेहनतीने सिनेसृष्टीत आपलं स्थान टिकवून आहे. कामाच्या बाबतीत अभिनेत्री कधीच हलगर्जीपणा करताना दिसलेली नाही. त्यामुळे मेहनती, कष्टाळू अभिनेत्रीच्या यादीत भार्गवीच नाव आवर्जून घेतलं जातं.