प्रत्येक कलाकाराचे काहीना काही स्वप्न असतंच आणि त्या स्वप्नपूर्तीसाठी प्रत्येक कलाकार झटत असतो. जीवापाड मेहनत घेत असतो आणि अखेर एकेदिवशी ते स्वप्न सत्यात उतरवतोच. अशीच एक स्वप्नपूर्ती झालेला कलाकार म्हणजे लावणीकिंग आशिष पाटील. अनेक हिंदी व मराठी डान्स रिअॅलिटी शोमध्ये नृत्यदिग्दर्शक म्हणून झळकलेला लोकप्रिय नृत्यकलाकार म्हणून आशिष पाटील हे नाव सर्वश्रुत आहे. आज अनेक पुरस्कार सोहळ्यांमध्ये लावणी म्हटलं की आशिष पाटीलच्या नृत्यदिग्दर्शनाला प्राधान्य दिलं जातं.
आशिषने नुकताच त्याचा स्वत: डान्स स्टुडिओ सुरु केला असून इन्स्टाग्रामवर एक खास व्हिडीओ शेअर करत त्याने ही माहिती सर्वांना दिली आहे. मुंबईतील गोरेगाव या ठिकाणी त्याने हा डान्स स्टुडिओ सुरु केला असून या स्टुडिओमध्ये सर्व प्रकरचे डान्स क्लासेस, रील्स शूटिंग, वर्कशॉप्स आणि सर्व प्रकारच्या रिहर्सल्स पार पडणार आहेत. असं त्यांनी या व्हिडीओद्वारे सांगितलं आहे. आशिषच्या या नवीन स्टुडिओनिमित्त मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी त्याचे कौतुक केले आहे. अशातच अभिनेत्री अमृता खानविलकरने आशिषचे कौतुक करत एक खास पोस्ट लिहिली आहे.
अमृताने या पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की, “प्रिय आशिष, आज मला तो दिवस आठवतो जेव्हा मी तुला परफॉर्म करताना आणि तुझ्याबरोबर काम करण्यासाठी तुझ्या विश्वात पाऊल टाकले. तिथून मी तुझ्या प्रवासाची साक्षीदार आहे. मग ‘बाई गं’ व ‘चंद्रा’ या गाण्यांच्या माध्यमातून तुझ्याबरोबर आयुष्यभराची आठवण निर्माण करण्यासाठी एकत्र येणे हा एक आशीर्वादच होता. तुझी आवड व तुझी मेहनत इतकी भारावून टाकणारी आहे की, ती तुझ्या आजूबाजूच्या लोकांनाही चांगले काम करण्यास प्रवृत्त करते. माझ्या आयुष्यात आल्याबद्दल आणि तुझे नृत्याचे कौशल्य मला शिकवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद”.
आणखी वाचा – आजचे राशी भविष्य : आज ‘या’ राशीच्या लोकांवर होणार शनिदेवाची कृपा, कुणाच्या भाग्यात नेमकं काय?, जाणून घ्या…
यापुढे अमृताने असं म्हटलं आहे की, “कलांगण ही खास जागा तुझ्या मेहनतीचे व निखळ उत्कटतेचे प्रतीक आहे आणि त्याचबरोबर ती तुझे प्रतिनिधित्वही करते. मी तुला तुझ्या आत्ताच्या सर्वोत्कृष्टतेशिवाय काहीही शुभेच्छा देऊ इच्छित नाही. ‘कलांगण’ ही नर्तक, कलाकार, अभिनेते, गायक आणि कलेच्या विविध रूपांवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकासाठीची खास जागा आहे. त्यामुळे या ठिकाणच्या वातावरणाचा अनुभव नक्की घ्या.” दरम्यान, अमृतासह प्रसाद ओक, हेमांगी कवी, समृद्धी केळकर, अवधूत गुप्ते यांश अनेक कलाकारांनी आशिषला त्याच्या नवीन डान्स स्टुडिओसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.