छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते?’ ही मालिका गेले काही दिवस चांगलीच चर्चेत आहेत. गेली साडेचार वर्षे ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. गेल्या साडेचार वर्षात या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. मालिकेत आजवर अनेक बदल झाले. अनेक मोठे ट्विस्ट आले. यावेळी प्रेक्षकांनी त्यांच्या प्रतिक्रियाही दिल्या. अशातच मालिकेत नुकतेच आशुतोषचे निधन झाल्याचा ट्विस्ट पाहायला मिळाला. सोशल मीडियावर या नवीन ट्विस्टने चांगलाच धुमाकूळ घातला. मात्र या नवीन ट्विस्टमुळे या मालिकेवर अनेकांनी आपली नाराजी व्यक्त केली.
मालिकेत आलेले हे धक्कादायक वळण प्रेक्षकांना आवडलेले नाही. ‘आई कुठे काय करते’च्या या नवीन प्रोमोवर प्रेक्षक चांगलेच संतापले होते. आशातच आता या मालिकेचा आणखी एक नवीन व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सुलेखा ताई म्हणजेच आशुतोच आई आशुतोषच्या निधनाला अरुंधती जबाबदार असल्याचे म्हणतात. तसेच “ती आता माझी कुणीही लागत नाही. आशुतोषने कायम तिची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी धडपड केली. मात्र अरुंधतीने कायम त्याच्याकडे दुर्लक्ष केले” असं म्हणतात
या नवीन प्रोमोवरसुद्धा चाहत्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. अनेकांनी या नवीन प्रोमोवर नकारात्मक कमेंट्स करत प्रतिसाद दिला आहे. या व्हिडीओखाली नेटकऱ्यांनी “खूप फालतू मालिका आहे, एक तरी नाते व्यवस्थित दाखवा, हे बघून हसावं की रडावं तेच कळत नाहीये” अशा अनेक कमेंट्स केल्या आहेत. तसेच अनेकांनी या व्हिडीओखाली संजनाची बाजू घेतली असल्याचे पाहायला मिळत आहे. एकाने तिची बाजू घेत असं म्हटलं आहे की, “संजना अगदी योग्य आहे. ती बोलते ते बरोबर असतं” तर आणखी एकाने “अरुंधती चुकली आहे आणि आता ती संजना व अनिरुद्धच्या मध्ये मध्ये येत आहे” अशी कमेंट केली आहे.

मालिकेत आतापर्यंत संजना हे पात्र कुणालाच आवडत नव्हते. तिच्या नकारात्मक भूमिकेमुळे तिचा सर्वांना राग येत होता. मात्र आता संजना ही योग्य असल्याचे अनेक प्रेक्षकांना वाटत आहे. त्यामुळे अनेक चाहते संजनाची बाजू घेत आहेत. दरम्यान, मालिकेतील आशुतोषच्या अचानक जाण्याने अरुंधतीच्या आयुष्यात आता काय नवीन बदल होणार? याची प्रेक्षक वाट पाहत आहेत.