मराठी कलाक्षेत्रात अशी बरीच कलाकार मंडळी आहेत ज्यांच्या मुलांनी आई-वडिलांच्या पाठोपाठ सिनेसृष्टीत पाऊल टाकलं आहे. तर काही कलाकारांच्या मुलांनी त्यांच्या आई-वडिलांप्रमाणे अभिनयक्षेत्र न निवडता अन्य क्षेत्रात पाऊल टाकलं आहे. या कलाकारांपैकी एका अभिनेत्याचं नाव आवर्जून घेतलं जाईल ज्याच्या दोन मुलांपैकी एकाने सिनेसृष्टी निवडली आहे तर एकाने अन्य क्षेत्रात यश कमावलं आहे. हे अभिनेता म्हणजे शरद पोंक्षे. शरद पोंक्षे यांच्या लेकीला सगळेच ओळखतात. आपल्या लेकीच्या कौतुकास्पद अनेक पोस्ट ते वेळोवेळी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअरही करतात. (Sharad Ponkshe Son)
शरद पोंक्षे यांची कन्या पेशाने पायलट आहे. लेकीच्या कौतुकामुळे ते बरेचदा चर्चेत असतात. यानंतर आता शरद पोंक्षे हे त्यांच्या लेकामुळे चर्चेत आले आहेत. नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमांमधून शरद पोंक्षे यांच्या दर्जेदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. मात्र आता शरद पोंक्षे एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. लवकरच शरद पोंक्षे निर्मिती क्षेत्रात पदार्पण करणार असून या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांचा लेक म्हणजेच स्नेह पोंक्षे करणार आहे.
अद्याप चित्रपटाचे नाव ठरलेले नसून या नव्या चित्रपटाच्या निमित्ताने वडिल-मुलाची जोडी एकत्र काम करणार आहेत. या चित्रपटाच्या टीमने मुंबईतील सिद्धिविनायकाचे आशीर्वाद घेत चित्रपटाचा शुभारंभ केला. या चित्रपटाचे लेखन स्नेह पोंक्षे याने केले आहे. ही जोडी नक्की कोणत्या विषयावर चित्रपट घेऊन येणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
याबद्दल निर्माते शरद पोंक्षे म्हणाले, ‘’एका नवीन भूमिकेतून तुमच्या भेटीला येत आहे. विशेष म्हणजे मुलाच्या बरोबरीने ही वेगळी भूमिका साकारत आहे. यापूर्वी स्नेहने पाच वर्षं सह-दिग्दर्शक म्हणून काम केले आहे आणि या चित्रपटाच्या निमित्ताने तो दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. मला खात्री आहे, तो ही जबाबदारी उत्तमरित्या पेलेल’’. तर दिग्दर्शक स्नेह पोंक्षे त्याच्या या वाटचालीबद्दल बोलताना म्हणाला, ” लवकरच हा चित्रपट आम्ही प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहोत. आम्ही सुद्धा या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहोत. चित्रीकरणाला सुरूवात होणार असून विषय, शीर्षक, कलाकार हे लवकरच आम्ही जाहीर करु. पदार्पणात वडिलांसह काम करण्याची संधी मिळाली आहे, त्याचा विशेष आनंद आहे’’.