छोट्या पडद्यावरील ‘सारेगमप’ या लोकप्रिय गाण्याच्या शोमधून अवघ्या घराघरात लोकप्रिय झालेली गायिका म्हणजे मुग्धा वैशंपायन. मुग्धाने तिच्या सुरेल आवाजाने चाहत्यांना मंत्रमुग्ध केले आहे. मुग्धाच्या गाण्याची लोकप्रियता वाढल्याने तिला अनेक ठिकाणांहून गाण्याच्या कार्यक्रमासाठी बोलावले जाते. सध्या महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरही मुग्धाचे गायनासाठीचे दौरे वाढलेले पाहायला मिळत आहेत. सोशल मीडियावर मुग्धा नेहमीच सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांसह प्रत्येक अपडेट्स शेअर करताना दिसते.
मुग्धा अलीकडेच एका कार्यक्रमानिमित्त अंदमानला गेली होती. तिथून परत आल्यावर ती थेट रत्नागिरीत तिच्या सासरी आरवलीला पोहोचली आहे. मुग्धा तिच्या व्यस्ततेमधून वेळ काढून आरवलीला गेली असून प्रथमेशसह ती सध्या आरवलीमध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे. नुकतंच काही दिवसांपूर्वी मुग्धाच्या सासऱ्यांनी संपूर्ण कुटुंबीयांसाठी बटाटेबडे बनवले होते. याचे खास फोटो मुग्धाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले होते.

अशातच आता मुग्धाच्या काकूंनी खास बेत केल्याचा पाहायला मिळाला. मुग्धाने खास पदार्थ असलेल्या एका ताटाचा फोटो शेअर केला असून यामध्ये ओल्या काजूंची उसळ, पोळी, कांद्याच्या पात्याची तिखटी व कांदा-काकडीसारखे पदार्थ पाहायला मिळत आहे आणि हे खास पदार्थ नीना काकूंनी बनवले असल्याचे तिने म्हटले आहे. तसेच हा खास फोटो शेअर करत तिने असं म्हटलं आहे की, “गेले अनेक दिवस सतत बाहेर जेवत होते. म्हणून घरच्या जेवणाची खूप आठवण येत होती. त्यामुळे आज खूप दिवसांनी घरच्या त्यातही नीना काकूंच्या हातचं जेवून फारच बरं वाटत आहे.”
आणखी वाचा – आधी निलेश साबळेची एक्झिट, आता ‘चला हवा येऊ द्या’ घेणार प्रेक्षकांचा निरोप, शेवटचा एपिसोडही झाला शूट
मुग्धा-प्रथमेश ही गायन क्षेत्रातील लोकप्रिय जोडी म्हणून ओळखली जाते. दोघांच्याही गायनाचे अनेक चाहते आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक गोष्टीबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते खूपच उत्सुक असतात. दोघेही त्यांच्या गायनाने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करतात. दरम्यान, गायिका सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. मुग्धा-प्रथमेश नेहमीच परंपरा, संस्कृती जपत चाहत्यांचं मनोरंजन करत असल्याने या दोघांवर सोशल मीडियावर नेहमीच कौतुकाचा वर्षाव केला जातो.