कलाकार मंडळींना चित्रीकरणानिमित्त नेहमीच घरापासून दूर राहावं लागतं. कित्येकदा या कलाकार मंडळींना शूटिंगसाठी अनेक दौरेही करावे लागतात. कित्येक कलाकार घरापासून, कुटुंबापासून बराच काळ दूर राहूनप्रेक्षकांच मनोरंजन करण्यात कधीच अडखळत नाही. आलेल्या प्रत्येक संकटाना सामोरं जात ही कलाकार मंडळी आपलं काम नित्यनियमाने करत असतात. तरीही एक माणूस म्हणून या कलाकार मंडळींनाही मनं आहेत, त्यांनाही भावना आहेत. (Prasad Jawade Statement)
एखादवेळेस शुटिंगनिमित्त घरापासून दूर असणारी ही कलाकार मंडळी त्यांच्या कुटुंबियांच्या आठवणीत भावुकही होतात. अशातच एका मराठमोळ्या अभिनेत्याने नुकत्याच ‘इट्स मज्जा’ला दिलेल्या मुलाखतीत घरापासून दूर शूटिंग करतानाची खंत व्यक्त केली आहे. हा अभिनेता म्हणजे प्रेक्षकांचा लाडका प्रसाद जवादे. ‘बिग बॉस’मराठीमधून प्रसाद जवादे घराघरांत पोहोचला. याशिवाय प्रसाद त्याच्या लग्नामुळे चर्चेत राहिला. प्रसादने अभिनेत्री अमृता देशमुखसह लग्नगाठ बांधली आहे. प्रसाद व अमृताच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगलेली पाहायला मिळाली.
लग्नानंतर प्रसाद व अमृता यांनी लगेचच कामाला सुरुवात केली. अमृता सध्या तिच्या नाटकांच्या प्रयोगांमध्ये व्यस्त आहे. तर प्रसाद सध्या झी मराठी वाहिनीवरील ‘पारू’ या नव्या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसत आहे. प्रसाद सध्या त्याच्या या नव्या मालिकेच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या मालिकेच्या शूटिंगसाठी प्रसाद सध्या साताऱ्यात आहे. तो त्याच्या घरापासून दूर राहून मालिकेचं शूटिंग करत आहे. घरापासून दूर राहून शूटिंग करत असताना प्रसादला घराची, बायकोची आठवण सतावतेय असं म्हटलं.
प्रसाद म्हणाला, “आम्ही सातारा येथे शूट करत आहोत. कधी कधी घराची खूप आठवण येते. माझं नुकतंच लग्न झालं आहे, त्यामुळे बायकोला सोडून राहावं लागतं तो एक मोठा टास्क आहे. अधूनमधून आम्ही एकमेकांना भेटतो. कधी ती साताऱ्यात तर कधी मी मुंबईत असं भेटणं सुरुच असतं. ‘चला हवा येऊ द्या’च्या निमित्ताने आज मुंबईत येता आलं तर आजही आमची भेट झाली”.