‘बिग बॉस ओटीटी सीझन २’मध्ये सतत बडबड करत प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या मनीषा राणीने आता ‘झलक दिखला जा ११’ या डान्स रिऍलिटी शोचे विजेतेपद पटकावले आहे. या सीझनमध्ये ‘बिग बॉस १६’चा फायनलिस्ट व मराठी ‘बिग बॉस’चा विजेता शिव ठाकरेदेखील सहभागी झाला होता. मात्र या रिऍलिटी शोमध्ये त्याला टॉप पाच स्पर्धकांमध्ये स्थान मिळवता आले नाही. “आता ज्याच्या हातात जास्त पैसा आहे तोच विजेतेपदाच्या लायक आहे”, असं म्हणत शिवने मनीषा राणीच्या विजयावर ताशेरे ओढले आहेत. (Shiv Thakare On Manisha Rani)
या प्रवासाबाबत बोलताना शिव म्हणाला की, “त्याला खूप काही शिकायला मिळाले आहे. माझा आजवरचा प्रवास खूप मोठा आहे. देव प्रवासाचा मार्ग पाठवतो. जसे मी खतरों के खिलाडी मध्ये स्पर्धक म्हणून काम केले. त्याच्याप्रमाणे मी झलक दिखला जा ११ मध्ये सहभागी झालो. मी या रिऍलिटी शोमधून काहीतरी खास शिकून बाहेर आलो आहे जे कदाचित मला पैसे देऊनही बाहेर शिकता आले नसते”.
शिव म्हणाला की, “‘झलक दिखला जा ११’ या मंचावर तो मनापासून नाचला, त्यामुळेच प्रेक्षकांना तो आवडला. माझा इथवरचा प्रवास खूप लांबचा आहे, त्यामुळे मला लगेच यश मिळण्यासाठी वर जाण्याची गरज नाही, मला पायऱ्या चढत यश मिळवायचं आहे. मी सर्वसामान्यांमधून आलो आहे. हे सर्व माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. मी स्वप्नवत जीवन जगत आहे. यादरम्यान भेटलेले काही लोक चांगले आहेत, काही वाईट आहेत, मी सर्वांना अगदी जवळून अनुभवले आहे”.
शिव ठाकरे यांने मनिषा राणीबाबत केलेल्या वक्तव्यामुळे तिचे चाहते नाराज आहेत. एका यूजरने लिहिले आहे की, “मला वाटले की, तू खूप छान माणूस आहे, पण तू गर्विष्ठ निघाला”. तर दुसऱ्याने लिहिले, “या व्यक्तीला नृत्याचा डीदेखील माहित नाही जो स्वतःला पात्र समजतो. या नृत्यापेक्षा वार्षिक समारंभातील नृत्य उत्तम आहे. पूर्वी आदर होता, आता शून्य आहे”. तर काहींनी “मनीषा पैशाने जिंकली नाही, ती प्रतिभेने जिंकली”, अशी प्रतिक्रिया दिली आहे.