अशी बरीच कुटुंब आहेत जी सिनेसृष्टीत काम करत अभिनयाचा वारसा जपत आहेत. तर अनेक भावंडं आहेत जी सिनेसृष्टीत सक्रिय असलेली पाहायला मिळत आहेत. बऱ्याच बहिणी अभिनेत्री असून एकाच क्षेत्रात कार्यरत आहेत. अशातच सिनेसृष्टीतील एक बहिणींची जोडी म्हणजे करिष्मा कपूर व करीना कपूर. करिष्मा व करीना यांनी आजवर त्यांच्या अभिनयाने व सौंदर्याने सिनेसृष्टीला भुरळ घातली आहे. बरेचदा दोघीही एकत्र स्पॉट होतानाही दिसतात. नुकत्याच झालेल्या अनंत अंबानी व राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग सोहळ्याला दोघींनीही एकत्र हजेरी लावली होती. (Kareena Kapoor Karishma Kapoor Struggle Story)
करीना कपूर खान व करिष्मा कपूर या दोन बहिणींमधील बॉन्डिंग कोणापासून लपलेले नाही. बॉलिवूडच्या या लोकप्रिय बहिणी एकमेकांची कंपनी नेहमीच व खूप एन्जॉय करतात. करीनाला करिष्माबद्दल खूप काळजी आहे. अशातच एकदा करीना तिच्या बहिणीच्या संघर्षाच्या दिवसांबद्दलही बोलली आहे. सिमी ग्रेवालच्या शोमध्ये करिना हजेरी लावली होती. यावेळी बोलताना तिने करिष्माबद्दल एक आश्चर्यकारक खुलासा केला होता. तिच्या बालपणीच्या दिवसांची आठवण करुन देताना करीना कपूर म्हणाली होती की, “मी माझ्या बहिणीला रात्रभर रडताना पाहिले आहे”.
अभिनेत्री म्हणाली, “ती रात्री आईबरोबर बसायची आणि तिला सांगायची की इंडस्ट्रीतील अनेक लोक तिला अपमानित करण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळी मी खूप लहान होते. त्यामुळे त्या दोघी माझ्यासमोर असे काही बोलायच्या नाही. मी गुपचूप त्यांचे बोलणे ऐकायचे. त्यांच्या या सगळ्या गोष्टी ऐकून मला खूप त्रास व्हायचा”.
जेव्हा बेबोला विचारण्यात आले की तिच्या बहिणीच्या संघर्षाने तिला अभिनेत्री होण्यापासून कधी रोखले आहे का? तर यावर करीना म्हणाली, “अजिबात नाही. या सगळ्या गोष्टी बघतच मी मोठी झाले आहे. या गोष्टींनी मला खूप खंबीर बनवले आहे”.
करीना असंही म्हणाली होती की, “आज मी इतकी मजबूत झाली आहे की, मी जगातील प्रत्येक गोष्ट हाताळू शकते. माझ्या आयुष्यात कितीही वेदना आल्या, कितीही लोक मला खाली खेचण्याचा प्रयत्न करत असले तरी मी त्या सर्वांशी लढायला तयार आहे. मी माझ्या आई व बहिणीला या समस्यांना तोंड देताना पाहिले आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींसाठी मी आधीच तयार झाले”, असं ती म्हणाली.