सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. सध्या इंटरनेटवर सर्वत्र ‘डॉली चहावाला’ची चर्चा सुरू आहे. ‘मायक्रोसॉफ्ट’ कंपनीचे सह-संस्थापक व जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले बिल गेट्स यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एका चहावाल्याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये इंटरनेटवरील प्रसिद्ध ‘डॉली चहावाला’ दिसत आहे. डॉली हा त्याच्या चहा बनवण्याच्या शैलीमुळे अधिक प्रसिद्ध आहे. याच पद्धतीने ‘डॉली चहावल्या’ने बिल गेट्स यांना चहा पाजला आहे. पण आता ‘डॉली चहावाला’ बिल गेट्स यांना नेमका कसं भेटला? दोघांची ओळख कशी झाली? असे प्रश्न अनेकांना पडले आहेत. (Dolly chaiwala on bill gates)
बिल गेट्स यांनी डॉली चहावाल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी हा व्हिडीओ शेअर करताच प्रचंड व्हायरल झाला. या व्हिडीओला त्यांनी कॅप्शन लिहिले आहे की, “भारतात फिरताना तुम्हाला प्रत्येक ठिकाणी नावीन्य दिसून येईल. साधा चहा बनवण्यामध्येही नावीन्य आहे!”, असे लिहीत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
याबद्दल चहा विक्रेत्याला बिल गेट्स यांच्याबद्दल विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला की, “ते कोण आहेत याबद्दल मला अजिबात कल्पना नव्हती. मला वाटलं फक्त परदेशी व्यक्ती आहेत असे समजून मी त्यांना चहा दिला. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा नागपूरला आलो तेव्हा मला समजलं की ते नक्की कोण आहेत. आम्ही एकमेकांशी अजिबात बोललो नाही. ते माझ्या शेजारीच उभे होते आणि मी माझ्या पद्धतीने चहा बनवत होतो. मी दाक्षिणात्य चित्रपट पाहतो आणि ते पाहूनच मी असा चहा बनवायला शिकलो. मला वाटतं की मी आज खऱ्या अर्थाने ‘नागपूरचा डॉली चहावाला’ झालो आहे आणि मला खूप अभिमान वाटत आहे. भविष्यात मला पंतप्रधान नरेंद्र मोदींना चहा देण्याची इच्छा आहे”, असंही तो म्हणाला.
‘डॉली चहावाला’ हा गेल्या 15 ते 20 वर्षांपासून चहा विक्रेता आहे. त्यांच्या चहा बनवण्याच्या आगळ्या वेगळ्या शैलीमुळे तो इंटरनेटवर अधिक प्रसिद्ध झाला आहे. सध्या त्याचे इन्स्टाग्रामवर 10 लाखांपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत.