टेलिव्हिजनवरील ‘दिया और बाती हम’ ही मालिका आजही सर्वांच्या लक्षात आहे. त्यातील संध्या बिंदणी व भाबो ही पात्र आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. गृहिणी ते पोलिस ऑफिसर असा संध्याचा प्रवास मालिकेमध्ये पाहायला मिळाला. 6 वर्ष या मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंज केले. त्यानंतर 2016 ला मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. पण या मालिकेतील संध्याची भूमिका करणारी दीपिका सिंह आज तिच्या नवीन मालिकेमुळे चांगलीच चर्चेत आहे. सध्या ती ‘मंगल लक्ष्मी’ मालिकेतून प्रेक्षकांच्या समोर येत आहे. (Diya aur Baati fame actress on marriage)
2016 नंतर दीपिका ही अभिनयापासून दूर असलेली दिसली. पण ती सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप सक्रिय होती. नृत्य व अभिनयाच्या माध्यमातून ती प्रेक्षकांचे मनोरंजन करत होती. आता बराच कालावधीनंतर ती मालिकाविश्वात पदार्पण करत आहे. ‘मंगल लक्ष्मी’मध्ये ती ‘मंगल’ची भूमिका साकारत आहे. यानिमित्ताने तिने ही मालिका निवडण्याचे कारण सांगितले आहे. ती म्हणाली की, “मला या मालिकेची स्क्रिप्ट खूप आवडली. ‘मंगल’ हे पात्र कुटुंबाला धरून ठेवणारे आहे. मी एक महिला आहे त्यामुळे ही भूमिका अतिशय भावली आणि म्हणून मी या मालिकेची निवड केली”, असे तिने सांगितले.
याबरोबरच तिने तिचा अभिनय क्षेत्रातील संघर्ष आणि प्रेमकहानीबद्दलही भाष्य केले आहे. ती म्हणाली की, “मला आधीपासूनच अभिनयाची आवड होती. दिल्ली ते नोएडापर्यंत मी अनेक कार्यक्रम करायचे. याला घरच्यांचा आधी विरोध होता पण मला त्यांनी कधी थांबवलं नाही”, असं तिने सांगितलं.
पुढे ती लग्नाबद्दल सांगताना म्हणाली की, “रोहित खूप चांगला आहे. तो नेहमी मला पाठिंबा देतो. सुरवातीला केवळ आमची जात वेगळी असल्याने अडचणी येत होत्या. पण नंतर घरचेही लग्नासाठी तयार झाले”, असे ती म्हणाली. या मुलाखतीदरम्यानचा एक मजेशीर किस्सा ती सांगताना म्हणाली की, “एकदा मी व रोहित बोलत असताना मी रोहितला म्हणाले की युरोपला फिरायला जाऊया. त्यावर रोहितने उत्तर दिले की, मी मालिकेचा दिग्दर्शक आहे त्यामुळे मी तुझ्याबरोबर नाही फिरू शकत. मी अभिनेत्रीबरोबर फिरलो तर चुकीच्या चर्चा होतील. पण जर लग्न केलं तर नक्की फिरू शकतो. त्यावर मी लगेच म्हणाले की चल लग्न करूया. मी घरी जाऊन आई-वडिलांना सांगितले की मला युरोप फिरायचं आहे त्यामुळे मी लगेच लग्न करतेय आणि मला फक्त रोहितबरोबरच फिरायचं आहे”, असं तिने सांगितले. त्यानंतर दोघेही लग्नबंधनात अडकले.
सध्या दीपिका ‘मंगल लक्ष्मी’मध्ये काम करत असून तिला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.