‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमधील काही लोकप्रिय कलाकारांपैकी एक अभिनेत्री म्हणजे विशाखा सुभेदार. आजवर अनेक लोकप्रिय विनोदी कार्यक्रमांमधून विशाखा यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. उत्तम विनोदी अभिनेत्री असण्याबरोबरच विशाखा यांनी आजवर अनेक वैविध्यपूर्ण भूमिकाही साकारल्या आहेत. आजवर आपल्या भूमिकांनी चर्चेत राहणाऱ्या विशाखा यांनी नुकतीच त्यांच्या एक इन्स्टाग्राम पोस्टमुळे चर्चेत आली आहे. विशाखा सुभेदारने यांनी नुकतीच तिच्या घरी काम करणाऱ्या एका महिलेबाबतची कौतुकास्पद पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती.
या पोस्टमध्ये विशाखा यांनी त्यांच्या घरी काम करणाऱ्या महिलेने २ बीएचके घर घेतल्यानिमित्ताने तिच्याबरोबरचा खास फोटो पोस्ट करत तिचे कौतुक केले होते. “माझ्याबरोबर काम करणाऱ्या माणसांची प्रगती झाली की मला खूपच कौतुक वाटतं. मग ती हेअर ड्रेसर असो किंवा स्पॉटबॉय असो किंवा ड्राइव्हर. परमेश्वरानं एक खारीचा वाटा त्यांच्या यशात मला उचलायला सांगितला, माझ्याकडून ते करवून घेतलं यासाठी त्या ईश्वराचे आभार आणि शोभाचे खुप कौतुक” असं म्हणत त्यांनी ही पोस्ट शेअर केली होती.
मात्र विशाखा यांनी शेअर केलेल्या या पोस्टवर एकाने कमेंट करत विशाखा यांनी केलेल्या मदतीवरुन टोला लगावला आहे. एका नेटकऱ्याने विशाखा सुभेदार यांच्या पोस्टखाली कमेंट करत असं म्हटलं आहे की, “केलेली मदत सांगून नाही दाखवायची असे मला तरी वाटते. पण ती केलेली मदत व्यक्त करू शकते असे माझे मत आहे. काही चुकले असेल तर क्षमस्व. पुढील मदतीसाठी शुभेच्छा”.
नेटकऱ्याच्या या कमेंटवर विशाखा यांनीही उत्तर देत असं म्हटलं आहे की, “ही मदत नव्हेच, माझ्या कुटुंबातील सदस्य, तिची मेहनत आणि त्यावरचा माझा आनंद याबद्दल ही पोस्ट आहे, यात कुठेही मदत हा शब्द नाहीये. साथीदार व साक्षीदार असे शब्द आहेत. तिने केलेल्या एका उत्तम कामगिरीची ही पोस्ट आहे”.
दरम्यान, विशाखा यांनी केलेल्या या कृतीनिमित्त या पोस्टखाली अनेकांनी तिचे कौतुक केले आहे. अशीच प्रोत्साहन देत राहा, खूपच छान, आपल्याबरोबर असणाऱ्यांना अशीच कायमस्वरूपी साथ देऊन त्यांनां मोठं करा” अशा अनेक कमेंट्स करत विशाखा यांच्या अनेक चंहत्यांनी त्यांचे कौतुक केले आहे.