अभिनेता आमिर खान व त्याची पत्नी किरण राव हे दोघेही त्यांच्या ‘लापता लेडीज’ या आगामी चित्रपटामुळे चांगलेच चर्चेत आहेत. ‘लापता लेडीज’च्या निमित्ताने किरणने तब्बल ११ वर्षांनंतर दिग्दर्शनाची धुरा हाती घेतली आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी किरण व आमिर अनेक ठिकाणी एकत्र दिसून येत आहेत. घटस्फोट झाल्यानंतर दोघेही पहिल्यांदाच व्यावसायिक क्षेत्रामध्ये एकत्र काम करत आहेत. अनेकदा मीडियासमोर किरण आमिरबद्दलच्या नात्यावरुन अनेकदा भाष्य करत असते. लग्नाच्या १६ वर्षानंतर दोघांनी संगनमताने घटस्फोट घेतला. त्यानंतर दोघेही मुलगी आयराच्या लग्नामध्ये एकत्र स्पॉट झाले होते. (Kiran Rao on Aamir Khan)
चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान एका मुलाखतीमध्ये किरणला विचारले की, “आमिरच्या प्रसिद्धीचा काय फायदा झाला?”, त्यावर ती म्हणाली की, “मी आमिरचा पूर्ण वापर करुन घेते. त्याच्या प्रसिद्धीचा वापर मला जिथे गरज आहे तिथे करुन घेते. तो आता माझ्या बाजूला असता तर मी लगेच त्यांच्याकडे अजून तीन चित्रपटांची मागणी केली असती. मी सर्वांनाच सांगते आहे की आमिरने चित्रपट बनवला आहे तो एक तारखेला प्रदर्शित होतोय तो नक्की बघा. मी त्यांचा पुरेपूर वापर करते आणि त्याबद्दल मला लाज वाटत नाही”, असे तिने हसत हसत सांगितले.
किरण खासगी तसेच व्यावसायिक आयुष्याबद्दल नेहमीच दिलखुलासपणे व्यक्त होत असते. आमिरबद्दल कौतुक करताना ती कधीही थांबत नाही. त्यांचा जेव्हा घटस्फोट झाला तेव्हा आमिरने सर्व परिस्थिती अत्यंत व्यवस्थितपणे हाताळली असल्याचेही तिने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते. विभक्त झाल्यानंतरही दोघांचे संबंध अतिशय चांगले आहेत. दोघांच्याही विभक्त होण्याचा कोणताही विपरीत परिणाम मुलांवर होणार नाही याची काळजीही त्यांनी घेतली होती.
किरणने दिग्दर्शित केलेला ‘लापता लेडीज’ हा चित्रपट एक फेब्रुवारीला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांनी खूप पसंती दिली. यामध्ये सर्व नवोदित कलाकारांना संधी देण्यात आली आहे.