अवघ्या महाराष्ट्राची ‘कलरफुल’ अभिनेत्री म्हणजे पूजा सावंत. ‘मन धागा धागा जोडते नवा’ असं म्हणत पूजाने मराठीसह हिंदी प्रेक्षकांचेही चांगलेच मनोरंजन केले. गेले काही दिवस पूजा चांगलीच चर्चेत आहे आणि या चर्चेचं कारण म्हणजे तिचं लग्न. अभिनेत्री गेले काही दिवस तिच्या लग्नामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. पूजाने सिद्धेश चव्हाणबरोबरचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर करताच तिच्या या नवीन नात्याविषयी सर्वांनाच उत्सुकता लागली होती आणि अशातच आता पूजा लवकरच विवाहबंधनातदेखील अडकणार आहे.
पूजा सावंतच्या घरी लगीनघाई सुरु असून तिच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली आहे. नुकताच पूजा व सिद्धेशचा शाही साखरपुडा सोहळा संपन्न झाला. तेव्हापासूनच तिच्या लग्नाची उत्सुकता निर्माण झाली होती आणि अखेर पूजा सिद्धेशबरोबर लग्नबंधनात अडकणार आहे. पूजाच्या घरी आज मेहंदी समारंभ सोहळा पार पडत आसून याचे काही फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात मेहंदी लूकमध्ये पूजा खूपच सुंदर दिसत असून तिच्या चेहऱ्यावर तेज खुलून आले आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये पूजाने मेहंदीसाठी खास लूक केला असल्याचे पाहायला मिळत आहे. पूजाने मेहंदी लूकसाठी पूजाने आकर्षक डिझाईन असलेला लेहंगा परिधान केला आहे आणि त्यावर आकर्षक मोराची डिझाईनदेखील आहे. त्याचबरोबर या लूकला साजेसा साजशृंगारही तिने केला आहे. पूजाने या हटके लूकवर खास मोत्यांचे दागिने व गळ्यात सुंदर असा हार परिधान केला आहे. या मेहंदी लूकमध्ये पूजाचे सौंदर्य हे अधिकच खुलून आले आहे.
दरम्यान, नुकताच मोठ्या दिमाखात पूजाचा संगीत समारंभ सोहळादेखील पार पडला. या संगीत सोहळ्याला अनेक कलाकार मंडळींनी हजेरी लावली होती. यावेळी पूजा-सिद्धेशनेदेखील चांगलाच ठेका धरला होता. अशातच आज पूजाचा हळदी समारंभ सोहळा पार पडत आहे. त्यामुळे तिच्या अनेक चाहत्यांना तिच्या लग्नसोहळ्याची आतुरता लागली आहे.