सिनेसृष्टीत लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत असताना प्रेक्षकांचा लाडका दगडू म्हणजेच अभिनेता प्रथमेश परब लग्नबंधनात अडकला आहे. प्रथमेशच्या लग्नाची काही दिवसांपासून चर्चा सुरु होती. अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या केळवणाच्या कार्यक्रमानंतर अखेर प्रथमेश लग्न बंधनात अडकला आहे. प्रथमेशने त्याची गर्लफ्रेंड क्षितिजा घोसाळकरसह शाही विवाह सोहळा उरकला आहे. त्यांच्या विवाह सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहायला मिळत आहेत. (Prathamesh Parab Kshitija Ghosalkar Wedding)
दिनांक २४ फेब्रुवारी रोजी प्रथमेश व क्षितिजाने त्यांचा शाही विवाह सोहळा उरकला. अगदी पारंपरिक अंदाजात व कोणताही अवाढव्य खर्च न करता त्यांचा विवाह सोहळा संपन्न झाला. यावेळी दोघांचाही पारंपरिक व साधा लूक प्रेक्षकांना विशेष भावला. लग्न समारंभासाठी प्रथमेशने कुर्ता पायजमा व डोक्यावर फेटा परिधान केला होता. तर त्याच्या बायकोने पिवळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली होती. त्याशिवाय त्यावर घातलेले मोत्यांचे दागिने ही आकर्षणाची बाब ठरली. वरमाला घालताना दोघांनीही एकमेकांना खाली वाकून नमस्कार करत आशीर्वाद घेतले. या कृतीनं साऱ्यांच मन जिंकलं.

लग्नानंतर आता क्षितिजा परबांची सून झाली असून ती परबांच्या घरात रमलेली पाहायला मिळत आहे. लग्नानंतरचे विधी करत असतानाचा त्यांचा एक फोटो सोशल मीडियावरुन त्यांनी शेअर केला आहे. यावेळी क्षितिजाचा लग्नानंतरचा लूकही पाहायला मिळत आहे. अगदी साधी राहणीमान असलेल्या क्षितिजा व प्रथमेशच्या साधेपणाचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे.
प्रथमेश परब व क्षितिजा घोसाळकर यांचा मराठमोळ्या पद्धतीने विवाहसोहळा संपन्न झाला आहे. काही दिवसांपूर्वीच म्हणजेच व्हॅलेंटाईन डेला दोघांच्या नात्याला तीन वर्ष पूर्ण होताच दोघांनी साखरपुडा केला. त्यांच्या साखरपुड्याचे फोटोही सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसले. शिवाय दोघांच्या प्री-वेडिंग फोटोशूटनेही साऱ्यांची मन जिंकली. गेली अनेक वर्ष प्रथमेश व क्षितिज एकमेकांना डेट करत होते. दोघांनी त्यांच्या प्रेमाची जाहीर कबुलीही सोशल मीडियावरुन चाहत्यांसह शेअर केली.