रंगमंच, रुपेरी पडदा, टेलिव्हिजनवर जबरदस्त अभिनय व विनोदी भूमिकांमुळे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस पडले. सिनेसृष्टीत अशोक सराफ यांनी आपल्या अभिनयाने मराठीसह हिंदी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. अशातच मराठी चित्रपट व नाट्यक्षेत्रातील भरीव योगदानासाठी अशोक सराफ यांना २०२३ वर्षाचा मानाचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. यानंतर सर्वच स्तरातून अशोक सराफ यांचं कौतुक होताना पाहायला मिळालं.
राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान असणारा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार तसेच ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार’ याबरोबरच राजकपूर जीवनगौरव, चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कार प्रदान करण्यासाठी २२ फेब्रुवारी रोजी मुंबईमध्ये दिमाखदार सोहळा आयोजित केला होता.
आणखी वाचा – अखेर सगळं संपलं! मानसी नाईक नवऱ्यापासून कायमची वेगळी, घटस्फोट होताच म्हणाली, “भूतकाळामधील गोष्टी…”
या खास समारंभास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर, महाराष्ट्र राज्य चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अविनाश ढाकणे, संजय पाटील आणि सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
अशोक सराफ यांना ‘महाराष्ट्र भूषण’सारख्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मान होणे, हे त्यांनी आजवर केलेल्या कामाची खूप मोठी पोचपावती असं म्हणणं वावगं ठरणार नाही. दरम्यान, अशोक सराफ यांच्या या सर्वोच्च सन्मानामुळे कलाकार मंडळी, राजकीय नेते इतकंच नव्हे तर समस्त प्रेक्षकवर्गाकडून अशोक सराफ यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.