‘बघतोय रिक्षावाला’, ‘बाई वाड्यावर या’ ही गाणी कानावर आली की, डोळ्यासमोर अभिनेत्री मानसी नाईकचा चेहरा समोर उभा राहतो. या गाण्यांमुळे मानसीला प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर उचलून धरलं. तिने आजवर केलेल्या कामाचं नेहमीच कौतुक झालं. सतत चेहऱ्यावर हास्य असणारी ही अभिनेत्री मात्र तिच्या खासगी आयुष्यामध्ये अपयशी ठरली. २०२३मध्ये मानसीने एक धक्कादायक गोष्ट सगळ्यांसमोर आणली. तिने पती प्रदीप खरेरासह घटस्फोट घेणार असल्याचं जगजाहिर केलं. आता अखेरीस तिचा घटस्फोट झाला आहे. याबाबतची पोस्ट तिने स्वतः सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केली आहे. (manasi naik and pardeep kharera divorce)
मानसी व प्रदीप आता एकमेकांपासून अधिकृतरित्या वेगळे झाले आहेत. याबाबतची पोस्ट दोघांनीही त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे सगळ्यांना सांगितली. तसेच आता सगळ्या बंधनातून मुक्त झाले असल्याचंही मानसीने यावेळी म्हटलं. मानसीची ही पोस्ट पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. या पोस्टबरोबरच मानसीने शेअर केलेले फोटो हे परदेशातील असल्याचं दिसत आहे. तसेच तिच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत आहे.
मानसीने म्हटलं की, “मी आता भूतकाळामधील सगळ्या गोष्टींमधून मुक्त झाले आहे. प्रत्येक पाऊल पुढे टाकताना माझी शक्ती वाढत आहे. जुन्या गोष्टींना निरोप आणि आयुष्यातील पुढच्या वाटचालींना नमस्कार. भूतकाळामध्येच रमण्यासाठी आयुष्य खूप लहान आहे. मी फक्त वर्तमान आणि भविष्यासाठी जगते. या संपूर्ण प्रवासामध्ये माझ्या पाठिशी जे खंबीरपणे उभे राहिले त्यांचे मनापासून आभार. नवी सुरुवात”. शिवाय ही पोस्ट शेअर करताना मानसीने घटस्फोटादरम्यानचा प्रवास, अखेर सगळं संपलं, खूप आनंदी, नवी सुरुवात असे हॅशटॅग दिले आहेत.
मानसीच्या या पोस्टबरोबरच तिचा पूर्वाश्रमीचा पती प्रदीपनेही एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो त्याच्या हातावरील टॅटू दाखवत आहे. तसेच व्हिडीओ शेअर करताना त्यानेही “नवं आयुष्य नवी सुरुवात” असं म्हटलं आहे. १९ जानेवारी २०२१मध्ये अगदी थाटामाटात मानसी-प्रदीपने लग्न केलं. मात्र वर्षभरानंतर या दोघांमध्ये वाद होऊ लागले. मानसी व प्रदीपने यादरम्यानच्या काळात एकमेकांवर आरोपही केले. अखेरीस दोघांनीही त्यांच्या आयुष्याला नव्याने सुरुवात केली आहे.