‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील आघाडीची मालिका म्हणजे ‘ठरलं तर मग’. ‘ठरलं तर मग’ ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत अव्वल स्थानावर असून प्रेक्षक या मालिकेला विशेष पसंती देताना पाहायला मिळत आहेत. या मालिकेच्या कथानकाने रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. तर मालिकेतील कलाकार आणि त्यांचे अभिनयही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. या मालिकेतील सायली-अर्जुनच्या जोडीला तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं आहे. (Jui Gadkari Mother Emotional)
‘ठरलं तर मग’ मालिकेत मुख्य भूमिकेत असलेल्या सायलीला म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरी हिला प्रेक्षकांचं विशेष प्रेम मिळताना पाहायला मिळत आहे. जुईने आजवर तिच्या विविधांगी भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. अनेक मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारत तिने छोट्या पदड्यावर आपलं वर्चस्व निर्माण केलं आहे. नुकतीच जुईने तिच्या आईसह एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. सुप्रसिद्ध लेखिका, कवयित्री रोहिणी निनावे यांच्या पहिल्या ‘सातवा ऋतू’ या कवितासंग्रह प्रकाशन सोहळ्याला जुईने तिच्या आईसह उपस्थिती दर्शविली.
रोहिणी निनावे यांच्या निवडक कवितांचे वाचन अभिनेत्री आसावरी जोशी, जुई गडकरी, शमा निनावे, अभिनेते आस्ताद काळे, मिलिंद फाटक, प्रसाद आठल्ये यांनी केले. यावेळी जुईने आईसाठीची कविता वाचून दाखविली. आईवर आधारित कवितेचं वाचन करताना जुईची खरी आईदेखील तिथे उपस्थित होती. आई या नाजूक विषयावर भाष्य करणाऱ्या कवितेचं वाचन जुईने जड अंतःकरणाने केलं. यावेळी अभिनेत्रीची आई समोर बसली होती. त्यांच्याही डोळ्यात अश्रू पाहायला मिळाले.
जुईसह तिच्या आईचा साधेपणाही प्रेक्षकांना विशेष भावला. या कार्यक्रमादरम्यानचा मायलेकींचा समोर आलेला व्हिडीओ पाहून त्यांच्यातील खास बॉण्डिंग पाहायला मिळालं. जुईची आई लेकीची काळजी घेताना दिसली. पडद्यावर जुईने साकारलेली जशी साधीभोळी व्यक्तिरेखा आहे अगदी त्याच स्वभावात मोडणारा असा जुईचा खऱ्या आयुष्यात स्वभाव आहे.