मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. यावेळी अशोक सराफ यांचे कुटुंबही उपस्थित होते. सर्वच स्तरातून अशोक सराफ यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशोक सराफ यांची स्तुतीसुमने गायली. (CM Eknath Shinde On Ashok Saraf)
अभिनेते अशोक सराफ यांना या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्याआधी एकनाथ शिंदे असे म्हणाले की, “अष्टपैलू हा शब्द ज्यांना लागू होतो ते म्हणजे अशोक सराफ. खऱ्या अर्थाने त्यांचं अभिनंदन करावं तेवढं कमीच आहे. ‘महाराष्ट्र भूषण’ हा राज्याचा सर्वोत्तम पुरस्कार आज त्यांना प्राप्त होत आहे. त्यांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो. सलग पन्नास वर्ष असंख्य भूमिका करत अभिनयाची वा नवं काहीतरी करुन दाखवण्याची भूक आजही त्यांच्यात कायम आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, ७५ वर्ष झाली तरी सुद्धा अजूनही त्यांची उमेद कायम आहे. खरं म्हणजे त्यांना मराठी मातीतला अस्सल हिरा असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मराठी मातीला व मराठी माणसाला तुमचा सार्थ अभिमान आहे”.
पुढे ते म्हणाले, “खरं म्हणजे त्यांच्या अमृतमहोत्सव साजरा करताना महाराष्ट्र सरकारचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार त्यांना देण्यात येत आहे. हे त्यांच्यासाठी आणि आपल्या सरकारसाठी देखील अभिमानाची व गौरविण्याची बाब आहे. शिवाय आपल्या सिनेसृष्टीसाठी आनंदाची बाब आहे. अवघ्या महाराष्ट्रासाठी हा केवळ अभिमानाचा नाही तर अमृताहूनी गोड क्षण असा हा आजचा दिवस आहे. खरं म्हणजे अशोक सराफ यांचं आडनाव सराफ असलं तरी त्यांची दागिण्यांची पेढी वगैरे काही नाही आहे. मात्र त्यांनी त्यांच्या अभिनयाने मराठी रसिक मनावर सोने, चांदी व मोत्यांची अक्षरशः उधळणं केलेली आहे”.
पुढे त्यांनी असंही म्हटलं आहे की, “आधी नाटक, मग चित्रपट, त्यानंतर कालांतराने टीव्हीविश्वात अवतरलेले अशोक सराफ यांनी स्वतःची मर्यादा व सामर्थ्य अचूक ओळखून आपली कारकिर्द पद्धशीरपणे बांधली. खऱ्या अर्थाने तिन्ही माध्यमातील त्यांच्या अविस्मरणीय भूमिकांनी प्रेक्षकांची देखील अभिरुची संपन्न केली. अशोक सराफ यांनी संपूर्ण महाराष्ट्राला पोट धरून हसवलं. त्यांच्या अभिनयाने आपलं जगणं सुसहय्य देखील केलं. म्हणून आज त्यांचा सन्मान करत थोडीशी त्यांचा कार्याची किंबहूना त्यांची परतफेड करण्याचा आमचा थोडासा ऋृणातून उतराई होण्याचा प्रयत्न केला आहे”.
अशोक सराफ यांचं कौतुक करत एकनाथ शिंदे असंही म्हणाले की, “रसिकांनी अशोक भाऊंना भरभरुन प्रेम दिलं. आज त्यांचा ‘महाराष्ट्र भूषण’ म्हणून सत्कार होत आहे. हा पुरस्कार मिळत असला तरी त्यांच्यातला साधा माणूस, निरागस चेहरा महाराष्ट्रासाठी कायम भूषावत राहिलं, असं देखील याठिकाणी सांगतो. यश, पैसा, प्रसिद्धी सगळं मिळाल्यावर देखील त्यांच्यातील माणूसकी केवळ शिल्लक नाही तर जागी ठेवली आहे. खरं म्हणजे रंगमंचाच्या मागे काम करणाऱ्या विस्मृतीत गेलेल्या काही निवडक कलावंतानासुद्धा त्यांनी आवश्यकतेनुसार मदत केली. हा देखील त्यांचा स्वभाव वाखाणण्याजोगा आहे. त्यांना हा पुरस्कार देऊन महाराष्ट्र शासनाने या पुरस्कारची उंची वाढवलेली आहे. त्यांच्या या पुरस्कारात बेटरहाफ म्हणजेच अभिनेत्री निवेदिता सराफ यांचा देखील वाटा आहे. यशस्वी पुरुषाच्या मागे कोणाचा हात असतो हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. म्हणून मी त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो. अशोक सराफ यांची हीच उर्जा त्यांच्या शंभरीपर्यंत कायम मिळत राहो, अशा प्रकारच्या मी शुभेच्छा देतो आणि पुन्हा त्यांचं मनापासून अभिनंदन करतो”, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.