मराठीतील भारदस्त आवाजासाठी ओळखलं जाणारं लोकप्रिय नाव म्हणजे आदर्श शिंदे. आनंद शिंदे यांनी त्यांच्या गाण्यांनी एक काळ गाजवला. आजही आनंद शिंदेंची गाणी प्रत्येक कार्यक्रमात वाजवली जातात. आनंद शिंदेंप्रमाणे त्यांचा मुलगा आदर्श शिंदेनेही या क्षेत्रात त्याचं मोठं नाव कमावलं आहे. गेल्या चार दशकांपासून अख्ख्या महाराष्ट्राला आपल्या गाण्यांवर थिरकायला लावणारा आदर्श शिंदे हा त्याच्या गायनाबरोबर मस्तीखोर स्वभावामुळेई चांगलाच चर्चेत असतो.
आदर्श शिंदे सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. सोशल मीडियाद्वारे तो त्याचे अनेक फोटो व कामाची माहिती शेअर करत असतो. अशातच त्याने नुकत्याच शेअर केलेल्या एका फोटोमुळे सोशल मीडियावर सध्या त्याची चांगलीच चर्चा सुरु आहे. आदर्शने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका नवीन फोटोमुळे आदर्श शिंदे पुन्हा एका नवीन व्यवसायात उतरले आहेत का? असा चाहत्यांना प्रश्न पडला आहे.
आदर्शने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात त्याने रस्त्यावरील एका ज्यूस सेंटरच्या बाजूला उभा राहून फोटो काढला आहे. या फोटोसह त्याने लिहिलेल्या कॅप्शनने साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. यात त्याने असं म्हटलं आहे की, “नवीन बिसनेस सुरु केला आहे असं समजू नका. हा खूप जुना फोटो आहे. महाबळेश्वरला फिरायला गेलो होतो, तेव्हा माझ्या नावाचा हा ज्यूस सेंटर दिसला. मग काय ज्यूस तर घ्यायलाच हवा. त्यामुळे ज्यूस पण घेतला आणि फोटो पण काढला.”
यापुढे त्याने असं म्हटलं, “त्यावेळी आठवण म्हणून हा फोटो काढला होता. आता काही जुने फोटो पाहत असताना हा फोटो दिसला आणि एकटाच हसलो, तर म्हटलं ही गोड आठवण सर्वांबरोबर शेअर करूया. म्हणून माझा हा जुना फोटो तुमच्यासह शेअर करत आहे. सर्व आदर्श ज्यूस सेंटरला माझा जाहीर पाठिंबा.”
दरम्यान, अभिनेत्री क्रांती रेडकरने या फोटोखाली “बरं झालं, आता करिअरची काही चिंता नाही.” अशी कमेंट्स केली आहे. तसेच आदर्शच्या अनेक चाहत्यांनी या फोटोखाली “काय बात हे दादा एक नंबर, मला वाटलं गायक व्हायच्या आधी तुम्ही लिंबू सरबत विकायचे का?” अनेक मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.