महाभारतातील श्रीकृष्णाची भूमिका साकारत प्रसिद्धी मिळवलेले अभिनेते म्हणजे नितीश भारद्वाज. नितीश भारद्वाज सध्या आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत. अभिनेत्याने पत्नी स्मिता घाटे यांच्याविरोधात तक्रार दाखल केल्याचे वृत्त केले आहे. नितीश यांनी पत्नीवर मानसिक छळ केल्याचा आरोपही केला आहे. ‘फ्री प्रेस जर्नल’ने दिलेल्या अपडेटनुसार, नितीश यांनी बुधवारी भोपाळचे पोलिस आयुक्त हरिनारायणाचारी मिश्रा यांच्याकडे मदत मागितली आहे. (Nitish Bharadwaj News)
नितीश यांनी पत्नीविरोधात लेखी तक्रार दाखल केली असल्याचं समोर आलं आहे. त्यांच्या तक्रारीत असं लिहिण्यात आलं आहे की, स्मिताबरोबरच्या दीर्घ लग्नानंतर त्यांनी त्यांची पत्नी स्मितासह २०१९ मध्ये मुंबई फॅमिली कोर्टात घटस्फोटाची याचिका दाखल केली होती आणि त्यांचा खटला अदयाप सुरु असल्याचं समोर आलं आहे. याचबरोबर नितीश यांनी पत्नी स्मिता यांच्यावर आरोप करत सांगितले की, ती त्यांना (नितीश) देवयानी व शिवरंजनी या मुलींना भेटू देत नाही किंवा त्यांच्याशी बोलू देत नाही.
स्मिता तिच्या (नितीश) मुलींच्या शाळा बदलत राहते. त्यामुळे नितीश यांच्या मानसिक स्थितीवर परिणाम होत आहे. नितीश यांचं दोनदा लग्न झालं आहे, पण त्यांची दोन्ही लग्ने टिकली नाहीत. १९९१ मध्ये त्यांनी पहिले लग्न केले. मोनिषा पाटील यांच्याबरोबर त्यांचे वैवाहिक जीवन सुरु झाले आहे, मात्र २००५ मध्ये दोघांनी घटस्फोट घेत ते वेगळे झाले. यानंतर नितीश यांनी स्मिताशी लग्न केले. नितीश व स्मिता यांचे २००९ मध्ये लग्न झाले होते. दोघांना जुळ्या मुली आहेत.
‘बॉम्बे टाइम्स’शी याबाबत बोलताना नितेश म्हणाले की, “मी एवढेच सांगू शकतो की कधी कधी घटस्फोट मृत्यूपेक्षाही जास्त वेदनादायक असू शकतो. जेव्हा कुटुंब तुटते तेव्हा सर्वात जास्त त्रास मुलांना होतो. त्यामुळे पालक या नात्याने आपणही जास्त काळजी घेतली पाहिजे की, त्यांना जास्त त्रास व्हायला नको”.