अभिनेता बॉबी देओल ‘ॲनिमल’ चित्रपटानंतर अधिक चर्चेत आला. एकही शब्द न बोलता केवळ इशाऱ्याने अभिनय करत त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. पण बॉबीच्या करिअरची सुरुवात ट्विंकल खन्नासह ‘बरसात’ या चित्रपटामधून झाली. १९९५ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटाला प्रेक्षकांनी पसंती देखील दर्शवली. याच चित्रपटाच्या निमित्ताने बॉबीने एक किस्सा संगितला. या चित्रपटातील बॉबीची सहअभिनेत्री ट्विंकल खन्नासह त्याची अनेकदा शाब्दिक वादावादी व्हायची असे त्याने सांगितले आहे. दोघेही एकाच चित्रपटामध्ये काम करत असताना देखील पूर्ण चित्रपट होईपर्यंत एकमेकांशी व्यवस्थित बोलत नव्हते. पण त्यांचे भांडण नक्की का होते ते जाणून घेऊया. (Bobby deol on twinkle khanna)
धर्मेंद्र यांचा मुलगा बॉबी व डिंपल कपाडियाची मुलगी ट्विंकल या दोघांनीही ‘बरसात’ या चित्रपटातून अभिनयाची सुरवात केली. दोघांचा हा पहिला चित्रपट होता पण तरीही बॉबी व ट्विंकलमध्ये तणावाचे वातावरण असायचे. चित्रपटाच्या सेटवर आल्यानंतर बॉबी नेहमी सकाळच्या दिनक्रमाबद्दल सांगत असे. त्याचा रोजचा दिनक्रम ऐकून ट्विंकल प्रचंड कंटाळत असे. बॉबीच्या बोलण्यामध्ये अनेकदा शिव्यादेखील असायच्या ज्यामुळे ट्विंकलचा पारा अजूनच चढायचा. ट्विंकल जेव्हा अधिक चिडायची त्यामुळे बॉबी अजून छेड काढण्यासाठी बोलत राहायचा. हा किस्सा सांगताना बॉबीला अक्षरशः हसू आवरत नव्हते.
मात्र काही काळाने बॉबी व ट्विंकलची मैत्री झाली. सिनेमाचे चित्रीकरण रोहतांग येथे सुरु होते. या ठिकाणी ऑक्सिजनचे प्रमाण खुपच कमी होते. अशा वातावरणामध्ये ट्विंकलला त्रास झाला आणि ती सेटवरच बेशुद्ध पडली. या प्रकारानंतर सर्वांचीच घाबरगुंडी उडाली. तिला नंतर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी घेऊन जात असताना बॉबी तिच्याबरोबर होता. या सर्व प्रकारानंतर दोघांमध्ये अखेर मैत्री झाली.
बॉबी सध्या चित्रपटांमध्ये सक्रिय आहे तर ट्विंकल मात्र सिनेसृष्टीपासून लांब आहे. पण ट्विंकल तिच्या लिहिल्या गेलेल्या पुस्तकांमुळे तसेच आक्षेपार्ह विधानांमुळे सतत चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी तिच्या पदवीप्रदान सोहळ्याचे फोटो अक्षयने अपलोड करत शुभेच्छा दिल्या होत्या. तसेच बॉबीदेखील आगामी काही ब्लॉकबस्टर चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.