भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची आज दुसरी पुण्यतिथी. लता मंगेशकर यांचं २०२२ मध्ये आजच्याच दिवशी निधन झालं होतं. त्यांनी आपल्या कारकिर्दीत ५० हजारांहून अधिक गाणी गायली. ३० हून अधिक भाषांमध्ये गाण्याचा विक्रमही लता मंगेशकर यांच्या नावावर आहेत. लता मंगेशकर या आज आपल्यात शरीररूपाने नसल्यातरी त्या त्यांच्या गाण्यांच्या माध्यमातून कायमच आपल्या स्मरणात राहतील. पण इतक्या महान व्यक्तीमत्त्वाला त्यांच्या प्रत्येक टप्प्यावर स्वत:ला सिद्ध करावं लागलं आहे. तर जाणून घेऊयात लता मंगेशकर यांच्याबद्दलचे कधी न ऐकलेले किस्से…
गायिका म्हणून लोकप्रिय असलेल्या लता मंगेशकर यांनी अगदी सुरुवातीच्या काळात अभिनेत्री म्हणूनही काम केले होते. वडिलांच्या निधनानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी लता मंगशकरांच्या खांद्यावर आली. त्याकाळात मास्टर विनायक यांनी त्यांच्या ‘पहिली मंगळागौर’ या मराठी चित्रपटासाठी त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांना पैशांची गरज होती म्हणून त्यांनी हो म्हटलं आणि या चित्रपटात छोटी भूमिकाही केली. चित्रपटातील ‘नटली चैत्राची नवलाई’ या गाण्यालाही त्यांनी आवाज दिला. या गाण्यासाठी त्यांना तेव्हा २५ रुपये आणि चित्रपटातील भूमिकेसाठी एकूण ३०० रुपये मिळाले होते.

गानसम्राज्ञी म्हणून ओळख मिळवणाऱ्या लता मंगेशकरांचा आवाजही एकेकाळी नाकारला गेला होता. काही वृत्तांनुसार, लता मंगेशकरांच्या गाण्याची कारकीर्द एवढ्या उंचीवर गेली नसती, असेही म्हटले जात होते. मात्र, १४ वर्षांच्या लताला पाहिल्यानंतर नूरजहाँ यांनी एक दिवस ती मोठी गायिका बनेल, असे सांगितले होते आणि अगदी तसेच झाले.
वयाच्या ३३व्या वर्षी लता मंगेशकर या प्रसिद्ध व लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचल्या होत्या. पण कुणाला तरी त्यांच्या प्रगतीचा इतका हेवा वाटला की, त्यांना विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला गेला. हा त्याच्या आयुष्यातील सर्वात कठीण व भयंकर काळ होता. यामुळे त्यांना तब्बल ३ महिने अंथरुणाला खिळून राहावे लागले. या कठीण काळात कवी मजरूह सुलतानपुरी त्यांचा आधार बनले. या अपघातामुळे त्यांचा आवाज गमवावा लागल्याचीही चर्चा होती. नंतर लता मंगेशकरांना विष दिलेल्या व्यक्तीबद्दल कळले होते. पण त्यांच्याकडे त्या व्यक्तीविरुद्ध ठोस पुरावे नव्हते. त्यामुळे त्याच्यावर पोलिस कारवाई होऊ शकली नाही.

लता मंगेशकरांच्या आवाजात एवढी वेदना होती की, माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरूही स्वतःला रडण्यापासून रोखू शकले नाहीत. १९६२ मध्ये चिनी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात निराशेचे वातावरण असताना ही घटना घडली. दरम्यान, २६ जानेवारी १९६३ रोजी लता दीदींना ‘ए मेरे वतन के लोगों’ या गाण्याला आवाज देण्याची विनंती करण्यात आली. वेळ कमी होता पण तरीही तिने ते मान्य केले.

लता मंगेशकरांचे पूर्वीचे नाव हेमा होते. नंतर त्यांच्या ‘भावबंधन’ या नाटकातील मुख्य स्त्री पात्र लतिका यांच्यावर प्रभाव पडून तिच्या वडिलांनी तिचे नाव लता ठेवले. तसेच लता मंगेशकरांच्या वडिलांचे पूर्वीचे नाव दीनानाथ अभिषेकी होते, पण त्यांच्या पुढच्या पिढीचे नाव पूर्णपणे वेगळे असावे अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे त्यांच्या पूर्वजांच्या गावाचे नाव मंगेशी आणि कुलदैवताचे नाव मंगेश, अशा प्रकारे त्यांनी आपले अभिषेकी आडनाव बदलून मंगेशकर केले. लता मंगेशकरांचे वडील दीनानाथ मंगेशकर हे ज्योतिषीदेखील होते. लताबाई कधीच लग्न करणार नाही असे त्यांनी आधीच सांगितले होते आणि अगदी तसेच झाले.
लता मंगेशकरांच्या करिअरमध्ये नौशाद साहब यांचा मोठा वाटा आहे. १९६० मध्ये आलेल्या ‘मुगल-ए-आझम’ चित्रपटात लता दीदी मधुबालाचा आवाज बनल्या होत्या. संगीत दिग्दर्शक नौशाद यांनी जवळपास १५० गाणी नाकारल्यानंतर ‘प्यार किया तो डरना क्या’ या गाण्याची निवड केली. काळात एक संपूर्ण चित्रपट १०-१५ लाख रुपयांमध्ये बनवला जात होता, परंतु या गाण्याची संपूर्ण किंमत ही १० लाख रुपये होती.
आणखी वाचा – सुप्रसिध्द मराठी अभिनेत्रीने चाहत्यांना दिली गुडन्यूज, सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत म्हणाली…
असा कोणताच पुरस्कार नव्हता, जो लता मंगेशकर यांना मिळाला नव्हता. त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार, पद्मभूषण, पद्मविभूषण, ३ वेळा राष्ट्रीय पुरस्कार, ४ फिल्मफेअर, तसेच भारतरत्न या पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले होते. लता मंगेशकर या पहिल्या भारतीय महिला गायिका होत्या. ज्यांनी परदेशात कार्यक्रमांची मालिका सुरू केली. त्यांनी १९७४ मध्ये लंडनच्या रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये पहिला गाण्याचा कार्यक्रम केला होता.

लता मंगेशकरांना कॉटनच्या साड्या खूप आवडत होत्या. त्यांनी रंगीबेरंगी साड्यांऐवजी पांढऱ्या रंगाच्या साड्या नेसणे पसंत केले. पांढरा रंग हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला चांगला शोभतो आणि लोक पांढऱ्या साडीतही चांगले दिसतात असे त्यांचे म्हणणे होते, त्यामुळे लता मंगेशकर कायम पांढऱ्या साड्या नेसत असत.

लता मंगेशकरांचे आपल्या भावडांवर खूप प्रेम होते. बहीण आशा भोसले यांच्यासाठी त्यांनी अभ्यासही सोडला. खरंतर लता मंगेशकर व आशा भोसले एकाच शाळेत शिकत होत्या. दोघांनाही शाळेत शिकण्यासाठी वेगळी फी भरावी लागत होती. घरची परिस्थिती बेताची असल्याने लता मंगेशकरांनी त्यांचे नाव काढून घेतले. त्यामुळे त्या फक्त २ दिवसच शाळेत गेल्या होत्या.
दरम्यान, लता मंगेशकरांचे आयुष्य ही अगदी विलक्षण होते. लता मंगेशकरांचे आत्मचरित्र लिहिण्याची इच्छा नव्हती. कारण त्यांना त्यांचे आयुष्य खाजगी ठेवायचे होते. त्यांना त्यांच्या जीवनप्रवासामुळे किंवा संघर्षामुळे कोणालाही दुखवायचे नव्हते. त्यामुळे “काही गोष्टी न सांगितल्या गेल्या तर बरं असतं” असं म्हणत त्यांनी त्यांच्या आत्मचरित्र लिहिण्याला कायमच नकार दिला.