अभिनेत्री पूनम पांडे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. २ फेब्रुवारीला पूनम पांडेच्या निधनाची बातमी समोर आली होती यामुळे सिनेसृष्टीत सर्वांना धक्का बसला होता. पण ३ फेब्रुवारीला सकाळी पूनमने स्वतःच्या इन्स्टाग्रामवर जिवंत असल्याची घोषणा केली. त्या दिवसापासून पूनम पांडे चांगलीच ट्रोल झाली आहे. लोकांनी तिला खूप वाईट व चांगले असं म्हटलं. ट्रोल झाल्यानंतर पूनम पांडेने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन पोस्ट शेअर करत स्वतःची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. (Poonam Pandey Fake Death News)
पूनम पांडेचे म्हणणे आहे की, तिने गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाबाबत लोकांना जागरुकतेचा इशारा देण्यासाठी तिच्या मृत्यूची खोटी बातमी पसरवली होती. पण लोकांना ही पद्धत चुकीची वाटली म्हणून त्यांनी पूनम पांडेला ट्रोल केले. पूनम पांडे आता तिच्या बचावासाठी एकामागून एक पोस्ट करत आहे ज्यात तिने ‘मला मारा, मला सुळावर चढवा’ असं काहीसं लिहिलेलं पाहायला मिळत आहे.
गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाबाबत जनजागृती करण्यासाठी पूनम पांडेने तिच्या ‘मृत्यू’ची खोटी बातमी पसरवल्याबद्दल सगळीकडून अभिनेत्रीला टीकेला सामोरे जावे लागत आहे. पूनम पांडेने पुन्हा एकदा इन्स्टाग्रामवर पोस्ट करत लिहिले आहे की, “मला मारा, मला सुळावर चढवा, माझा तिरस्कार करा, पण तुम्ही ज्याच्यावर प्रेम करत आहात त्या व्यक्तीला वाचवा” असं तिने म्हटलं आहे.
पूनम पांडे यांच्या सहकार्याने एक मार्केटिंग एजन्सी ही मोहीम चालवत होती. त्यांनीदेखील या मोहिमेअंतर्गत माफी मागितली. या एजन्सीने माफी मागत म्हटलं की, “होय, आम्ही पूनम पांडेच्या गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाविषयी जनजागृती करण्याच्या उपक्रमात सहभागी होतो. आम्ही मनापासून माफी मागू इच्छितो”. पूनमच्या निधनाची बातमी ऐकताच सुरुवातीला सगळ्यांनाच दुःखद धक्का बसला होता. तर अनेकांनी ती जिवंत असल्याचे दावेही केले होते. पूनम जिवंत असल्याचं समोर आलं. तिने स्वतः इन्स्टाग्रामद्वारे व्हिडीओ शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग याबाबत जनजागृती करण्याच्या हेतून हा स्टंट केला असल्याचं तिच्या व्हिडीओमधून दिसून आलं.