Poonam Pandey Died at 32 : बॉलिवूड अभिनेत्री व मॉडेल पूनम पांडेच्या अचानक निधनानंतर संपूर्ण कलाविश्वाला दुःखद धक्का बसला आहे. तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक पोस्ट शेअर करण्यात आली. यामध्ये पूनमचं निधन झालं असल्याचं तिच्या टीमद्वारे सांगण्यात आलं. तिचं निधन झालं असल्याच्या बातमीवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर चाहते हळहळ व्यक्त करत आहेत. शिवाय तीन दिवसांपूर्वी तिने गोव्यामधील तिचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामद्वारे शेअर केला होता. पूनमचं निधन अचानक कसं झालं? असा प्रश्न चाहते सातत्याने विचारत आहेत.
पूनमच्या टीमने ‘न्यूज १८’शी संपर्क साधत तिच्या निधनापूर्वीचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला. टीमने सांगितलं की, गुरुवारी (१ फेब्रुवारी) रात्री पूनमचं निधन झालं. पूनम युपीमधील तिच्या राहत्या घरी गेली होती. मात्र तिच्या सोशल मीडियावरील फोटो व व्हिडीओवरुन ती अगदी उत्तम असल्याचं दिसत होतं. सकाळी पूनमच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरताच सगळ्यांना धक्का बसला. बातमी खोटी असल्याचंही अनेकांनी म्हटलं. पण तिच्या संपूर्ण टीमने पूनमचं निधन झालं असल्याचं जाहीर केलं.
शिवाय पूनमच्या मॅनेजर टीमने तिच्या निधनापूर्वीचा संपूर्ण घटनाक्रमही सांगितला. पूनम युपीमधील घरी राहत होती. तिथे ती उपचारही घेत होती. शेवटच्या टप्प्याचा कॅन्सर असल्यामुळे पूनमला अधिक त्रास सहन करावा लागत होता. उपचारादरम्याने युपीमध्येच तिने शेवटचा श्वास घेतला असल्याचं तिच्या टीमकडून सांगण्यात आलं. शिवाय युपीमध्येच तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
बोल्ड फोटो, व्हिडीओ व लूकमुळे पूनम नेहमीच चर्चेत राहिली. शिवाय तिच्या वादग्रस्त विधानांमुळे अनेकदा तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागला. २०१३मध्ये ‘नशा’ या चित्रपटाद्वारे पूनमने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. कंगना रणौतच्या ‘लॉकअप’ शोमध्येही तिने उत्तम कामगिरी केली. तिच्या निधनानंतर कंगना भावुक झाली आहे. तिने इन्स्टाग्राम पोस्टद्वारे पूनमला श्रद्धांजली वाहिली आहे.