सध्या मराठी कलाकारांनी त्यांच्या अभिनयाचा मोर्चा इतर भाषांमध्ये वळवला आहे. मराठीसह ही कलाकार मंडळी हिंदी तसेच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत रमलेले दिसत आहेत. अशातच एका मराठमोळ्या अभिनेत्रीचा नुकताच एक तेलुगू भाषेतील चित्रपट सिनेरसिकांच्या मनावर राज्य करत आहे. या चित्रपटातील अभिनेत्रीच्या अभिनयाचंही सर्वत्र कौतुक होत आहे. ही अभिनेत्री म्हणजे ‘तू तेव्हा तशी’ मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री शिल्पा तुळसकर. (Shilpa Tulaskar Answers To Trollers)
शिल्पाने या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. नुकतीच ती ‘हाय नन्ना’ या तेलुगू चित्रपटात झळकली. या चित्रपटातील तिच्या भूमिकेच ही सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. या चित्रपटाचं हिंदी व्हर्जन ‘हाय पापा’ यामध्येही ती होती. या चित्रपटात तिने मृणाल ठाकूरच्या आईची भूमिका साकारली होती. शिल्पाने तिच्या फेसबुकवर मृणाल ठाकूरबरोबरचा एक फोटो शेअर केला. हा फोटो चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा असल्याचं कळत आहे. फोटोसह शिल्पाने मृणालसाठी लिहिलेलं कॅप्शन साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

मृणालबरोबरचा फोटो शेअर करत “तू खूप खास आहेस, तुझ्याबद्दलच्या माझ्या भावना सोशल मीडियावर शेअर करणं अशक्य. मी तुला कधीच कोणाशीही शेअर करणार नाही. पण एक कलाकार म्हणून तू किती बहरली आहे, हे सर्वांना कळावं अशी माझी इच्छा आहे. तुझा परफॉर्मन्स सहज वाटतो, पण त्यामागची मेहनत मी पाहिली आहे. हे सर्व करताना मी त्या खोडकर मुलीला भेटले, जिला मी काही वर्षांपूर्वी भेटले होते आणि मी पुन्हा पुन्हा तिच्या प्रेमात पडले. मृणाल ठाकूर तुला जे हवं ते सगळं मिळो,” असं कॅप्शन शिल्पाने दिलं आहे.

शिल्पाने सदर पोस्ट इंग्रजीमध्ये केली आहे. यावरुन एका नेटकऱ्याने केलेली कमेंट साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. फोटोखाली कमेंटमध्ये एका युजरने “केव्हातरी मराठीत पण व्यक्त हो अशी कमेंट केली आहे. नेटकऱ्याच्या या कमेंटला उत्तर देत शिल्पा म्हणाली, “मी कलाकार आहे, महाराष्ट्राची असल्याचा सार्थ अभिमान आहे पण माझे प्रेक्षक फक्त मराठी नाहीत. महाराष्ट्रीय असल्याचा आनंद आहे, पण मराठी किंवा महाराष्ट्राची या ओळखीपुरती मी स्वत:ला मर्यादित ठेऊ इच्छित नाही. त्यापल्याडच्या चाहत्यांचं प्रेम आणि पाठिंबा मला मिळाला आहे” असं म्हणत तिने नेटकऱ्याची बोलती बंद केली आहे.