‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मालिका प्रदर्शित झाल्यापासून या मालिकेने, मालिकेच्या कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं. या मालिकेतून सायली व अर्जुनच्या जोडीला तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतलं. मालिकेत सायली ही भूमिका जुई गडकरी साकारत आहे. या मालिकेतील भूमिकेतून जुई तिच्या अभिनयकौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. ‘ठरलं तर मग’ मालिकेआधी जुई छोट्या पडद्यावरील विविध मालिकांमधून प्रेक्षकांची मन जिंकत आली. (Jui Gadkari On Movie)
‘पुढचं पाऊल’ या मालिकेतील मुख्य भूमिकेमुळे जुईच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. याशिवाय ती ‘वर्तुळ’, ‘श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी’, ‘सरस्वती’ या मालिकेतही दिसली. ‘बिग बॉस’ मराठीमुळे जुई चर्चेत आलेली पाहायला मिळाली. छोट्या पडद्यावर लोकप्रिय असणाऱ्या जुईला मात्र चित्रपटांमध्ये काम करताना फारच कमी पाहायला मिळालं. मालिकाविश्वात सक्रिय असणारी जुई चित्रपटात केव्हा दिसणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
सोशल मीडियावर जुई बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. सेटवरील बीटीएस व्हिडीओ तसेच अनेक ट्रेंडिंग रील्स ती शेअर करताना दिसते. अशातच जुईने शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे. जुईने इंस्टाग्राम अकाऊंटवरून आस्क मी एनिथिंग हे सेशन घेतलं होत. यादरम्यान जुईला चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची तिने अगदी मनमोकळेपणाने उत्तर दिलेली पाहायला मिळाली. अशातच एका चाहत्याने जुईला तुला चित्रपटात काम करायला आवडत नाही का? असा प्रश्न विचारला असता, यावर उत्तर देत जुई म्हणाली, “आवडेल ना नक्कीच. पण मला कोणी चांगला चित्रपट ऑफर करतच नाही” असं उत्तर दिलेलं पाहायला मिळत आहे.

यादरम्यान जुईने चित्रपटात काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. जुईने केलेल्या या पोस्टनंतर तिला नक्कीच एखाद्या चांगल्या चित्रपटाची ऑफर येईल, यांत शंका नाही. त्यामुळे आता जुई मोठ्या पडद्यावर दिसणार का? याकडे आता चाहत्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.