सोशल मीडियाद्वारे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचणं आता सहज सोप्प झालं आहे. एखाद्या विषयावर फेसबुक, इन्स्टाग्रामद्वारे कित्येक जण व्यक्तही होताना दिसतात. यामध्ये कलाकार मंडळींचा तर मोठा वाटा आहेत. कित्येक कलाकार अनेक सामाजिक विषयांवर व्यक्त होतात. यामधूनच समाजसुधारणेलाही मदत होते. सोशल मीडियाद्वारे उघडपणे व्यक्त होणाऱ्या कलाकारांमध्ये मराठी अभिनेता शशांक केतकरचं नावंही टॉपला आहे. शशांक अगदी खुलेपणाने विविध विषयांवर भाष्य करतो. आताही त्याने शेअर केलेला व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे. (Shashank Ketkar Post)
शशांक सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुरांबा’ मालिकेमध्ये मुख्य भूमिकेत काम करताना दिसत आहे. त्याच्या या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. सध्या तो चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. चित्रीकरणादरम्यानचाच एक व्हिडीओ शशांकने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे शेअर केला आहे. पण या व्हिडीओमध्ये कोणी व्यक्ती नसून प्राणी दिसत आहे. हा प्राणी खेचर आहे.
शशांकने शेअर केलेला हा व्हिडीओ मढमधील आहे. बहुदा हा व्हिडीओ एका सेटवरील असावा. यामध्ये खेचर दारुची बॉटल तोंडाने पकडताना दिसत आहे. समुद्रकिनारी दारुच्या बॉटल पाहता शशांकने त्याच्या मोबाईमध्ये हा व्हिडीओ शूट केला. व्हिडीओ शेअर करत त्याने म्हटलं की, “नको रे नको सवय वाईट”. शशांकने शूट केलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
विशेष म्हणजे कामामधून वेळ काढत शशांक विविध व्हिडीओ किंवा फोटो शेअर करताना दिसतो. त्याचबरोबरीने त्याची पत्नी प्रियांका सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे. ती महत्त्वपूर्ण टिप्सही देताना दिसते. शशांकही आवश्यक त्या विषयांवर खुलेपणाने त्याचं मत मांडतो आणि चाहत्यांपर्यंत योग्य तो संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. त्याचा आता शेअर केलेला व्हिडीओही कचरा समुद्रकिनारी न फेकता त्याची योग्य ती विल्हेवाट लावली पाहिजे अशाप्रकारचा संदेश देणारा आहे.