Bigg Boss 17 Latest News : सलमान खानचा रिऍलिटी शो ‘बिग बॉस’च्या १७व्या पर्वाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या कार्यक्रमाचा फिनाले जसजसा जवळ येत आहे तसतशी स्पर्धकांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस’च्या घरातील स्पर्धकांमध्ये कधी प्रेम तर कधी संघर्ष पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, अंकिता लोखंडे व तिचा पती विकी जैन ही जोडी त्यांच्या भांडणांमुळे चर्चेत राहिली. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये, अंकिता व विकी जैन पुन्हा एकदा टास्क दरम्यान एकमेकांशी भांडताना दिसले.
‘बिग बॉस’च्या नव्या प्रोमोमध्ये, एका टास्क दरम्यान, अंकिता मुनव्वरची वकील बनली असून ती बनावट डॉकमध्ये उभा असलेल्या स्टँडअप कॉमेडियनच्या बाजूने खटला लढत होती. तेव्हा विकी तिची चौकशी करत होता. यादरम्यान अंकिताचा संयम सुटताना दिसतो. व्हायरल होत असलेल्या एका क्लिपमध्ये अंकिता व विकी भांडताना दिसत होते. यावेळी ‘बिग बॉस’ने मध्यस्थी करत विकीला अंकिताला बोलू देण्यास सांगितले. ‘बिग बॉस’ने विकीला सांगितले की, “तिला खेळू दे”. त्यानंतर विकीने ‘बिग बॉस’च्या निर्णयाचा आदर करत यावर होकार दिला आणि अंकिताने ‘बिग बॉस’चे आभार मानले.
विकीने पुन्हा अंकिताला दोष देत म्हणाला, “बिग बॉस तुला सांगण्याचा प्रयत्न करत आहे की तू तुझा खेळ सुरु कर”. यावर ‘बिग बॉस’ने आपली भूमिका स्पष्ट केली आणि सांगितले की, अंकिताला तिच्या रणनीतीवर मुनव्वरशी चर्चा करु द्या. मात्र त्यानंतरही विक्कीने अंकिताला बोलायचं काही थांबवलं नाही. त्यानंतर अंकिता चिडली आणि विकीला ताकीद देत म्हणाली, “माझ्याबरोबर असं करु नकोस कारण आपल्यात भांडण होईल आणि आपला घटस्फोटाचा खटला सुरु होईल”, अंकिताचं हे वक्तव्य ऐकून स्पर्धकासह ‘बिग बॉस’च्या घरातील सर्वांनाच धक्का बसतो.
अंकिताने घटस्फोटाचा मुद्दा बोलण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या आठवड्यात दोघांमध्ये झालेल्या जोरदार वादावेळी अंकिताने घटस्फोटाची मागणी केली होती.