भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू शिखर धवन मैदानावर खेळताना खंबीर आहे तसा तो त्याच्या खऱ्या आयुष्यात नाही. त्याचं वैयक्तिक आयुष्य सध्या सुरळीत नसल्याने तो डगमगलेला पाहायला मिळत आहे. पत्नी आयेशा मुखर्जीपासून विभक्त झाल्यामुळे धवन गेल्या एक वर्षापासून आपला मुलगा झोरावरला प्रत्यक्ष भेटू शकला नाही. लेकाच्या वाढदिवसानिमित्त इन्स्टाग्रामवर एका भावनिक पोस्ट शेअर करत धवनने असा दावा केला की, त्याच्या पत्नीने त्याला सर्व व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मवरून ब्लॉक केले आहे ज्यामुळे तो त्याच्या मुलाशी संपर्क साधू शकत नाही आहे. (Akshay Kumar On Shikhar Dhawan)
इन्स्टाग्रामवर धवनने भावनिक पोस्ट शेअर करत असे लिहिले आहे की, “मी तुला प्रत्यक्ष भेटून एक वर्ष झाले आहे, आणि आता, जवळजवळ तीन महिन्यांपासून, मला सर्वत्र ब्लॉक केले गेले आहे. माझ्या मुला तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मी तुझ्याशी थेट संपर्क साधू शकत नसलो तरीही, मी तुमच्याशी टेलिपॅथीद्वारे संवाद साधत होतो. मला तुझा खूप अभिमान आहे. बाबा नेहमी तुझी आठवण काढत आहे आणि तुझ्यावर प्रेम करत आहे. तो नेहमी सकारात्मक असतो, देवाच्या कृपेने आपण पुन्हा भेटू यासाठी मी तुझी हसतमुखाने वाट पाहत आहे. खोडकर हो, पण विध्वंसक होऊ नकोस, प्रेम देणारा हो. नम्र, दयाळू, सहनशील व बलवान हो. तुला न पाहिल्यावरही, मी जवळजवळ दररोज तुझ्यासाठी संदेश लिहितो, तुझ्या दैनंदिन जीवनाबद्दल विचारतो, मी काय करत आहे आणि माझ्या आयुष्यात काय नवीन आहे ते शेअर करतो. लव्ह यू लोड्स झोरा” अशी भावुक पोस्ट शिखरने लेकाच्या वाढदिवसानिमित्त लिहिली आहे.
शिखरची ही लेकासाठीची भावुक पोस्ट पाहून अनेकांनी प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. या पोस्टचा फोटो शेअर करत अक्षय कुमारनेही शिखरला धीर दिला आहे. अक्षयने पोस्ट शेअर करत लिहिले आहे की, “ही पोस्ट वाचून मला खूपच भरून आलं. एक वडील म्हणून मी हे पूर्णपणे समजू शकतो की आपल्या मुलांना भेटता किंवा बघता न येण्याइतकं दुःख कशाचंच नाही. शिखर तू धीर धर, तू तुझ्या मुलाला लवकरच भेटू शकशील यासाठी लाखो लोक प्रार्थना करत आहेत. देव भलं करो” असं म्हटलं आहे.

शिखर धवनची पत्नी आएशाने धवनला त्यांचा मुलगा झोरावर पासून लांब राहण्यास भाग पाडल्यामुळे त्यांना मानसिक त्रास झाला असे न्यायालयाने मान्य करत घटस्फोटाला परवानगी दिली होती. मात्र तरीही मुलाचा संपूर्ण ताबा धवनला देण्यात आलेला नाही. त्याऐवजी, धवनला मुलगा झोरावरला ठराविक कालावधीसाठी भेटण्याची तसेच व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून धवनला लेकाशी संवाद साधण्याची परवानगी देण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांचे व्हिडीओ कॉलवर बोलणे झाले होते पण तीन महिन्यांपासून शिखरला सर्वत्र ब्लॉक केल्यामुळे त्याच्या मुलाबरोबरचा संपर्क तुटला आहे.