मराठी मालिकेतील लोकप्रिय चेहरा म्हणजे अभिनेत्री अक्षया नाईक. ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या लोकप्रिय मालिकेतून अक्षयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. या मालिकेत अक्षयाने लतिका हे पात्र साकारले होते. हळवी तितकीच खंबीर अशी लतिका प्रेक्षकांना फार आवडली. मालिकेतील अक्षयाची भूमिका ही प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली. मात्र या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेताच अक्षयाने रंगभूमीवर एन्ट्री केली आहे. ‘चूकभूल द्यावी घ्यावी’ या नाटकात ती मुख्य भूमिकेत आहे. (Akshaya Naik Answers To Trollers)
पहिल्याच मालिकेत आव्हानात्मक भूमिका असल्यानं तिनं आपली अभिनय क्षमता दाखवून दिली. त्यामुळे अक्षया सशक्त अभिनेत्री असल्याचं स्पष्ट झालं. अभिनेत्री म्हणून काम करत असताना अक्षयाला बरेचदा ट्रोलिंगचा सामना हा करावा लागला. बरेचदा अभिनेत्रीला बॉडी शेमिंगवरुनही ट्रोल करण्यात आलं. दरम्यान अक्षया अनेकदा तिला न पटणाऱ्या गोष्टींवर बेधडकपणे भाष्य करताना दिसली. तसेच बॉडी शेमिंग करणाऱ्यांना सणसणीत उत्तरही दिलेलं आहे.
अक्षया सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असते. अशातच अभिनेत्रीने शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अभिनेत्रीने या पोस्टमध्ये बोल्ड फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने कॅप्शन देत, “हा फोटो मी माझ्या फोनच्या गॅलरीमधून इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करत आहे. ऑगस्ट २०२२ मध्ये केलेल्या फोटोशूटमधील हा फोटो आहे. मी हा फोटो सोशल मीडियावर अपलोड करण्यासाठी खूप जागरुक होते. माझे प्रेक्षक मला या बोल्ड लूकमध्ये स्वीकारतील की नाही याची मला खात्री नाही. कधीही न होण्यापेक्षा उशीरा का होईना मला जाणवले की मी एक कलाकार आहे. आणि जर मी माझ्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडले नाही तर माझी वाढही खुंटेल” असंही म्हटलं आहे.

तिच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी तिच्या या धाडसीपणाचं कौतुक केलं आहे. तर एका युजरने अभिनेत्रीने शेअर केलेला बोल्ड फोटो पाहून “तुला अशी पाहण्याची इच्छा नाही” अशी कमेंट केली आहे, यावर उत्तर देत अक्षयाने, ‘ओके’ असं म्हटलं आहे.