गेली अनेक वर्ष आपल्या सहज आणि सुंदर अभिनयातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणजे अलका कुबल. सुंदर, साथी, सोज्ज्वळ व आदर्श सून म्हणून मराठी चित्रपटसृष्टी त्यांनी ओळख निर्माण केली. ‘माहेरची साडी’ या चित्रपटातील त्यांची भूमिका आजही सगळ्यांना चांगली लक्षात आहे. चित्रपटातील त्यांनी साकारलेली लक्ष्मी अजूनही प्रेक्षकांच्या मनात घर करुन बसली आहे. अल्का जितक्या सुंदर अभिनेत्री आहेत तितक्याच छान त्या माणूसही आहे. बऱ्याचदा त्यांचा हा स्वभाव अनुभवायला मिळतो. मागे त्यांनी ‘कानाला खडा’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांच्या घरी काम करणाऱ्या बाईंनी अल्काताई त्यांच्याबरोबर कशा वागतात याचा खुलासा केला होता.(alka kubal treat her maid like her family member)
कार्यक्रमात त्या बाईंनी व्हिडीओद्वारे अल्काताईंबाबत मत व्यक्त केलं होतं. त्या बाई म्हणाल्या, “मी इथं कामाला लागल्यापासून तुम्ही वेगळं कधी वाटू दिलं नाही. मला त्यांनी घरच्यांसारखंच सांभाळून घेतलं. मला खाण्यापिण्याबाबतचे लाड नेहमी पुरवले. शिवाय तुम्ही माझ्या तब्येतीचीही बरीच काळजी घेतली. त्या मला खूप आवडतात. तुमचा स्वभाव मला खूप आवडतो. तुमच्या घरातील सगळी माणसं मला खूप आवडतात. दुसरी गोष्टी मला टिव्ही बघायला आवडते. तुम्ही संध्याकाळी मला माझी आवडती मालिका आवडीनं पाहायला देता. ते मला खूप बरं वाटतं. माझं स्वतःचं काही काम असेल तर ते तुम्हीच करता. मला ते करायलाच देत नाही”, असं सांगत त्यांनी अल्काताईंचं प्रेमळ कौतुक केलं होतं. त्यानंतर त्यांनी, “चालेल ना ताई माझं काम आणि स्वयंपाक घर सांभाळणार ना ताई?”, असा गोड विनोदी प्रश्न अल्काताईंना विचारला होता.
यावर उत्तर देताना अल्काताईंनी स्पष्ट करत म्हणाल्या होत्या, “हो त्या ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिका आवडीनं बघतात. आम्ही त्यावेळेला काही पाहत असलो तरीही त्यांची आवडती मालिका त्यांना लावून देतो. कारण त्या दिवसभर टिव्ही बघतातच असं नाही. त्या आता जे सांगत आहेत ते मला नवल वाटतं आहे. एवढ्या सगळ्या मालिका तर मी त्यांना बघू देणार नाही”.
पुढे त्यांनी सांगितलं होतं, “त्यांनी मालिका बघितल्या तर घरची कामं कोण करणार? मी मदत करते कारण दिवसभर त्या काम करत असतात. माझ्याबरोबर त्या माझ्या सासूबाईंनाही सांभाळतात. त्यापण थकतात, तेवढा विचार आपणही करायला हवा आणि तेवढी मदत आपणही करायला हवी. त्या आपल्याकडे कामाला आहेत म्हणून आपण अगदीच काही करायचं नाही. पायावर पाय ठेवून बसून राहायचं. हे मला पटत नाही”, असं सांगितलं होतं. यावरून त्यांच्यातील माणूसकी आणि त्या प्रत्येकाची कशाप्रकारे काळजी घेतात हे स्पष्ट होतं.