नव्वदीच्या काळातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या नारकर. आपल्या सहजसुंदर अभिनयाने व सोज्वळ सौंदर्याने या अभिनेत्रीने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. ऐश्वर्या सध्या झी मराठी वाहिनी वरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. त्या सोशल मीडियावरदेखील चांगल्याच सक्रिय असतात. विविध लुक्समधील फोटो व डान्स व्हिडीओ शेअर करत ते कायम चर्चेत राहत असतात. अशातच त्यांच्या एका कृतीमुळे त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. (Actress Aishwarya Narkar Shared Dance Practice Video On Instagram)
नुकतंच ऐश्वर्या यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्या डान्सचा सराव करताना दिसत आहेत. या डान्स सरावाची खास झलक त्यांनी या व्हिडीओद्वारे चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. दरम्यान या व्हिडीओखाली काही नेटकऱ्यांनी नकारात्मक प्रतिक्रिया करत त्यांना ट्रोल केलं आहे. या व्हिडीओखाली एका नेटकऱ्याने कमेंट करत “आजी देव देव करा” असं म्हटलं आहे. पण ऐश्वर्या यांनीही या नेटकऱ्याला “अरे बाळा, तुझ्या देवाने तुला सद्बुद्धी नाही का दिली?” असं म्हणत सडेतोड उत्तर दिलं आहे.
कलाकार म्हटलं की चाहत्यांना सोशल मीडिया किंवा इतर माध्यमांद्वारे अनेक सकारात्मक किंवा नकारात्मक प्रतिक्रिया येतच असतात. पण अशा प्रतिक्रियांवर काही कलाकार दुर्लक्ष करतात तर काही त्यांना प्रतिउत्तर देतात. दरम्यान ऐश्वर्या यांनी याआधीही अनेकदा अशा नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. त्याचबरोबर त्यांनी या कमेंटला इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये मेंशन करत “कधी सुधारणार?” असंही म्हटलं आहे.
दरम्यान, ऐश्वर्या यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओखाली त्यांना अनेक सकारात्मक प्रतिक्रियाही आल्या आहेत. अभिनेत्री तितिक्षा तावडे हिनेदेखील कमेंट करत व्हिडीओला पसंती दर्शवली आहे. तर काही नेकऱ्यांनी “अप्रतिम, छान, सुंदर, तुम्ही खूप छान दिसता आणि नाचताही छान” अशा अनेक कमेंट्स करत त्यांना हा व्हिडीओ आवडल्याचे देखील सांगितले आहे.