मराठी मनोरंजनसृष्टीत सध्या एका लग्नाची जोरदार चर्चा होत आहे. ती म्हणजे अभिनेता प्रसाद जवादे व अभिनेत्री अमृता देशमुख यांच्या लग्नाची. ‘बिग बॉस मराठी या कार्यक्रमातून ही जोडी लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. या कार्यक्रमानंतर दोघांमध्ये मैत्रीपूर्ण नातं निर्माण झालं. त्यानंतर काही महिन्यांनी दोघांनी आपल्या नात्याची जाहीर कबुली दिली होती. अवघ्या काही दिवसातच ही लाडकी जोडी विवाहबंधनात अडकणार असून दोघांच्या लग्नापूर्वीच्या विधींना नुकतीच सुरुवात झाली आहे. नुकतंच या जोडीचा ग्रहमख कार्यक्रम पार पडला. अशातच त्यांच्या लग्नाची पत्रिका सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. (Prasad Jawade and Amruta Deshmukh Wedding Invitation)
अमृताने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर या लग्नपत्रिकेचा खास व्हिडीओ शेअर केला. ज्याला तिने “आमच्या प्रेमाची गोष्ट, माझी कविता आणि आमच्या लग्नाची पत्रिका या स्वरूपात पाहायला आवडली.”, असा कॅप्शन दिलं आहे. त्याचबरोबर तिने या लग्नपत्रिकेत एक कविता देखील लिहिली, जी सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसते.
समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये अमृता व प्रसाद यांनी त्यांच्या बिग बॉसच्या घरातील प्रवासापासून ते लग्नापर्यंतच्या प्रवासाचे वर्णन केले. दोघांच्या हातात बिग बॉसच्या घरातील नावाची पाटी असून पुढे दोघं एका पारंपरिक पेहरावात दिसत आहे. त्याचबरोबर दोघांनी त्यांच्या चाहत्यांना निमंत्रण देताना “अनेक महिन्यांचा हा प्रवास शेवटी एका सुंदर वास्तवात उतरला. तुम्ही असंच आमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करत राहा.”, असं या पत्रिकेत म्हटलं आहे. ॲनिमेटेड स्वरूपातील या लग्नपत्रिकेसाठी अमृताने एक खास कविता देखील लिहिली. ज्यात तिने या सुंदर प्रवासाचे वर्णन केले.
हे देखील वाचा – Video : “सासूबाईंना तालावर नाचवलं आणि…”, ‘माझी तुझी रेशीमगाठ’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा व्हिडीओ चर्चेत, म्हणाली, “हौशी…”
“समांतर असा सुरु होता
त्या दोघांचा प्रवास..
अनपेक्षित क्षणी आला
सक्तीचा सहवास !
भिन्न स्वभाव, भिन्न विचार,
प्रेमावर मात्र दृढ विश्वास..
आधी त्याने घेतला हातात हात
मग तिने सोडली
नाही कधीच साथ..!
दोन मनांचा सुरू झाला
होता experimental संवाद…
मात्र permenant सुखी
जीवनासाठी हवेत आता..
फक्त तुमचे आशीर्वाद…!”
हे देखील वाचा – “हे गुलाब कोणाला बरं द्यावं?”, ओंकार राऊतच्या प्रश्नावर चाहत्यांनीच दिलं उत्तर, तर शिवाली म्हणाली…
दोघांच्या लग्नाची ही सुंदर पत्रिका सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर कलाकारांसह चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. येत्या १८ नोव्हेंबरला या जोडीचा शाही थाटात विवाहसोहळा पार पडणार असून या सोहळ्याला मराठी कला जगतातील अनेक मंडळी हजेरी लावणार असल्याचं बोललं जात आहे. काही महिन्यांपूर्वी या जोडीचा साखरपुडा सोहळा संपन्न झाला होता. तसेच केळवणाचा कार्यक्रमदेखील पार पडला. प्रसाद-अमृताच्या शाही विवाहाला अवघे काही दिवस उरले असून दोघांच्या लग्नाचे फोटो पाहण्यासाठी चाहते आतुरलेले आहेत.