बॉलिवूडमध्ये सध्या अभिनेता सलमान खानच्या ‘टायगर ३’ चित्रपटाची बरीच चर्चा होताना दिसत आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर बरेच रेकॉर्ड मोडताना दिसत आहे. दिवाळीच्या मुहुर्तावर प्रदर्शित झालेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या बराच पसंतीस उतरत आहे. अभिनेता सलमान खान व अभिनेत्री कतरिना कैफ मुख्य भूमिकेत असलेला हा चित्रपट पहिल्या दिवसापासूनच कमाल प्रदर्शन करत आहे. सलमानला पाहण्यासाठी चाहत्यांनी बरीच गर्दी केली आहे. चाहत्यांसाठी तर हा चित्रपट दिवाळीचं स्पेशल गिफ्ट ठरला आहे. १२ नोव्हेंबरला झालेल्या ब्लॉकबस्टर ओपनिंगनंतर ‘टायगर ३’ने दुसऱ्या दिवशीही जबरदस्त कमाई केली आहे. (Tiger 3 box office collection day 2)
या चित्रपटात ॲक्शनसह थ्रिलरचा मेळ पाहायला मिळत असल्यामुळे प्रेक्षकांना हा चित्रपट बराच आवडत आहे. त्यामुळे हा चित्रपट बरीच चांगलीच कमाई करताना दिसत आहे. नुकतेच चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनचे ताजे आकडे समोर आले आहेत. त्यामुळे यावर्षी ब्लॉकबस्टर ठरलेल्या शाहरुखच्या चित्रपटालाही सलमानच्या ‘टायगर ३’ चित्रपटाने मागे टाकलेलं पाहायला मिळत आहे. ‘जवान’ चित्रपटाने दुसऱ्या दिवशी ५३.२३ करोड रुपयांची कमाई केली होती. या चित्रपटाच्या तुलनेत सलमानच्या चित्रपटाने धुवादार कामगिरी केली आहे.
रिपोर्टनुसार, ‘टायगर ३’ चित्रपटाने दुसऱ्या दिवशी ५७.५० करोड रुपयांची कमाई केली आहे. हे आकडे हिंदी, तेलुगू व तामिळ या तिन्ही भाषेतील बॉक्स ऑफिस कलेक्शन आहेत. ‘टायगर ३’ चित्रपटाने पहिल्या दिवशी ४४.५ करोड रुपयांची ग्रेट ओपनिंग केली होती. दुसऱ्या दिवशी पण या चित्रपटाने शानदार कलेक्शन केलं. दुसऱ्या दिवशीचा कलेक्शन आकडा हा ५७.५० करोड इतका नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे या चित्रपटने दोन दिवसात १०० करोडचा आकडा पार केलेला पाहायला मिळत आहे. दोन दिवसात या चित्रपटाने १०२ करोडच्या जवळपास कमाई केली आहे.
चित्रपटाचा कमाई आकडा वेग असाच राहिला तर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल करणार आहे. त्यामुळे नक्कीच हा चित्रपट सलमान- कतरिनाच्या आयुष्यातील सर्वात मोठा चित्रपट ठरणार यात दुमत नाही. हे दोघं या चित्रपटाचं सेलिब्रेशन अगदी सणासारखा साजरा करताना दिसत आहेत. चित्रपटगृहातही सणासुदीचं वातावरण निर्माण झालं आहे. चित्रपटातील सलमानच्या अभिनयाने तर प्रेक्षकांना व चाहत्यांना चित्रपटगृहातील खुर्चांवर उभं राहून नाचायला भाग पाडलं आहे. पडद्यावर सलमान व शाहरुखला एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात त्यामुळे या चित्रपटात ही जोडी एकत्र दिसल्यामुळे चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.