बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक व निर्माता करण जोहरचा ‘कॉफी विथ करण सीजन ८’ सध्या बराच चर्चेत आहे. या कार्यक्रमात येणाऱ्या प्रत्येक कलाकारांविषयी जाणून घेण्यास चाहत्यांमध्ये कायमच उत्सुकता असते. या कार्यक्रमाच्या गेल्या भागात बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडी रणवीर सिंह व दीपिका पदुकोण येऊन गेले. त्यावेळी दीपिकाने केलेल्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर अनेक चर्चा रंगल्या होत्या. या शोच्या आगामी भागात अभिनेत्री सारा अली खान व अभिनेत्री अनन्या पांडे हजेरी लावणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यात सारा खान तिच्या खासगी आयुष्यावर बोलताना दिसत आहे. (Sara Ali Khan on shubman gill)
करण जोहरने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे ‘कॉफी विथ करण ८’ चा आगामी प्रोमो शेअर केला असून या प्रोमोमध्ये सारा व अनन्या एकत्र दिसणार आहेत. सध्या हा प्रोमो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये करणने दोघींनाही त्यांच्या लव्ह लाइफविषयी प्रश्न विचारल्याचे दिसत आहे. प्रोमोमध्ये करण साराला विचारतो की, “तुझ्या व शुभमन गिलच्या डेटिंगबद्दल खूप साऱ्या अफवा पसरत आहेत”. यावर उत्तर देताना सारा अली खानला हसू येते आणि यावर ती म्हणते की, “तुम्ही चुकीच्या साराला प्रश्न विचारत आहात. संपूर्ण जग हे चुकीच्या साराच्या मागे लागले आहे”.
सारा अली खानने केलेल्या या वक्तव्यामुळे नेटकऱ्यांमध्ये विविध चर्चा रंगत आहेत. साराच्या वक्तव्यामुळे शुभमन व सारा तेंडुलकर यांच्या रिलेशनशिपवर शिक्कामोर्तब झाला का? असाही प्रश्न निर्माण होत आहे. शुभमन हा अनेकदा सारा तेंडुलकरबरोबर सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसला होता. त्याचबरोबर सारादेखील अनेकदा शुभमनला मॅचदरम्यान पाठिंबा देताना दिसली.
दरम्यान सारा तेंडुलकर व शुभमन यांनी त्यांच्या नात्यावर अद्याप भाष्य केलेलं नाही. पण सारा अली खानच्या वक्तव्यानंतर शुभमन सारा अली खानला नाही तर सारा तेंडुलकरला डेट करत असल्याचे तर्क वितर्क लावले जात आहेत. आता या चर्चांनंतर तरी शुभमन व सारा तेंडुलकर त्यांच्या नात्याबाबत उघडपणे भाष्य करणार का? हे पाहावं लागेल.