‘बिग बॉस १७’ सुरु झाल्यापासून सर्वत्र या कार्यक्रमाची चर्चा रंगलेली दिसतेय. अशातच अभिनेत्री अंकिता लोखंडे यंदाचं पर्व गाजवताना दिसतेय. अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन हे दोघे ‘बिग बॉस’मध्ये स्पर्धक म्हणून एकत्र खेळताना दिसत आहेत. यांच्यात ‘बिग बॉस’च्या घरात आल्यापासून वाद सुरु झालेला पाहायला मिळतोय. या दोघांच्या नात्यात दुरावा आला, असल्याचीही चर्चा आहे. एकमेकांबरोबर आपापल्या आयुष्याबद्दल गप्पा मारत असताना अंकिताने पहिल्यांदाच तिच्या एक्स बॉयफ्रेंडबद्दल भाष्य केलं आहे. (Ankita Lokhande on Sushant Singh Rajput)
अंकिता लोखंडे आणि दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांचं एकमेकांवर प्रचंड प्रेम होतं, हे सर्वांनाच माहित आहे. मात्र काही कारणास्तव दोघांचं ब्रेकअप झालं. त्यानंतर अंकिताने विकी जैनबरोबर लगीनगाठ बांधली. दरम्यान अंकिता ‘बिग बॉस’च्या घरात नावेदसह गप्पा मारत असताना सुशांत सिंग राजपूतच्या आठवणीत भावुक झाली. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
अंकिता सुशांतबद्दल बोलताना असं म्हणाली की, “सुशांतबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर हे सगळं विसरणं खूप अवघड होतं. सगळं विसरून पुढं जाणं माझ्यासाठी सोपं नव्हतं. आम्ही खूप वर्षे रिलेशनशिपमध्ये होतो. त्यामुळे हा काळ खूप कठीण होता. ब्रेकअपनंतर त्या वेदनांवर मात करायला मला जवळपास अडीच वर्षे लागली. कारण मी दुसऱ्या कुणाला डेट करण्याचा विचारही करू शकत नव्हते. हे खूप वेदनादायक व धक्कादायक होते. पण मी प्रेमावर विश्वास ठेवण्याचे कधीही सोडले नाही. यातून बाहेर पडले आणि विकी माझ्या आयुष्यात आला”, असं अंकिता म्हणाली.
अंकिता पुढे म्हणाली की, “विकी माझ्या आयुष्यात आला तेव्हा तो माझा एक चांगला मित्र होता. आम्ही गप्पा मारायचो. तेव्हाही मी त्याला म्हणायचे की, माझा एक्स माझ्याकडे परत येईल, मी त्याची वाट बघेन. त्यानंतर हे कसे घडले मला माहित नाही, विकीनं थेट मला लग्नासाठीच प्रपोज केलं. तेव्हा विकीकडं मी लाइफ पार्टनर म्हणून पाहू लागले. या नात्यात येण्यासाठीही मला खूप वेळ लागला. असं नाही की, एकाबरोबर ब्रेकअप केल्यानंतर लगेच दुसऱ्याबरोबर मी नातं जोडलं. खरं तर ब्रेकअपनंतरचा काळ खूप वाईट होता, पण विकी आल्यानंतर आयुष्यचं बदलून गेलं” असंही अंकिता म्हणाली.