बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवली. २०१०मध्ये रिलीज झालेल्या ‘दबंग’ चित्रपटामधून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर तिने ‘राउडी राठोड’, ‘जोकर’, ‘लुटेरा’ सारख्या चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. आजवर साकारलेल्या अभिनयातून व स्टाईलिश अंदाजातून तिनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सोनाक्षी नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असते. सध्या ती नव्या चित्रपटामुळे नाही तर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. सोनाक्षीने नुकतच मुंबईत स्वतःचं आलिशान घर घेतलं आहे. तिच्या या नवीन घराची सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली आहे. (Sonakshi Sinha bought new apartment)
विशेष म्हणजे सोनाक्षीने खरेदी केलेलं हे घर सी फेसिंग आहे. तिने वांद्रे परिसरातील रंग शारदा सभागृहाजवळ ८१ ओरेटमध्ये ४,२०० चौरस फुटांचे हे सीफेसिंग घर आहे. तिच्या या घराची किंमत ११ कोटी रुपये इतकी सांगितली जात आहे. हे घर इमारतीत २६व्या मजल्यावर असून हा या इमारतीचा सर्वात टॉप फ्लोर आहे. रिपोर्टनुसार, आतापर्यंत या घरासाठी सोनाक्षीनं ५५ लाख रुपये भरले आहेत.
तिच्या या नवीन घराचा लॉबी एरिया ३४८.४३ स्क्वेअर फूट इतका आहे. विशेष म्हणजे हेल्पर टॉयलेट व एअर हँडलिंग युनिटसाठीही या घरात विशेष जागाही आहे. घराचा एकूण कार्पेट एरिया ४,२१०.८७ चौरस फूट आहे. याबरोबरच तिला चार कार पार्किंगची जागाही या घराबरोबर मिळणार आहे. माहीम खाडी व वांद्रे-वरळी सी लिंगचे सुंदर दृश्यही तिच्या या घरातून दिसतं.
तिने या घराचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. नेटकऱ्यांनीही लाईक व कमेंट करत तिला नवीन घरासाठी शुभेच्छा दिल्या आहे. एका नेटकऱ्याने ‘तुझा खुप अभिमान वाटतो. खूप छान जागा आहे’, असं म्हणत तिचं कौतुक केलं आहे. सोनाक्षी ही ‘बडे मियाँ-छोटे मियाँ’ चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिचा काही दिवसांपूर्वी ‘डबल एक्सएल’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. तसेच तिने ‘दहाड’ वेब सीरिजमध्येही काम केलं होतं. या सिरिजमध्ये तिने साकारेल्या भूमिकेचं प्रेक्षकांकडून विशेष कौतुक करण्यात आलं होतं.