‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाची क्रेज सध्या वाढलेली पाहायला मिळतेय. या कार्यक्रमाची रूपरेषा गायक अवधूत गुप्ते सांभाळत आहेत. आजवर या कार्यक्रमाला अनेक बड्या नेत्यांनी, तसेच अनेक बड्या कलाकारांनी हजेरी लावली. दरम्यान ‘खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रमाच्या या तिसऱ्या पर्वावर अनेकांनी आक्षेपही घेतला. अनेकांनी म्हटलं की, यंदाच्या पर्वात राजकारण्यांची हजेरी अधिक दिसतेय, हा मंच कलाकारांसाठी आहे. मनोरंजनाच्या कार्यक्रमांमध्ये फक्त राजकारण्यांनाच बोलवलं जातं, अशी टीका अनेकांनी केली. तर अनेकांनी कार्यक्रमाच्या दर्जावर बोट ठेवलं. (Supriya Sule Gets Emotional)
सध्या हा कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात असताना या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची हजेरी पाहायला मिळतेय. या कार्यक्रमामध्ये आत्तापर्यंत राज ठाकरे, नारायण राणे, संजय राऊत, देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी ही राजकारणी मंडळी येऊन गेली. त्यानंतर आता या मंचावर सुप्रिया सुळे येणार आहेत. झी मराठी वाहिनीने या कार्यक्रमाचा एक प्रोमो प्रदर्शित केला, यांत सुप्रिया सुळे यांची उपस्थिती पाहून रंजक ठरलं. शिवाय या प्रोमो मध्ये त्या भावुक झालेल्या पाहायला मिळाल्या. त्यामुळे साऱ्यांच्या नजरा सुप्रिया सुळे यांच्या या मुलाखतीकडे लागून राहिल्या आहेत.
सुप्रिया सुळे यांच्या वायरल झालेल्या प्रोमोवरून हे स्पष्ट होत आहे की, या कार्यक्रमात अजित पवार हे पक्ष सोडून जाण्यामुळे सुप्रिया सुळे हळव्या झाल्या आहेत. कार्यक्रमादरम्यान सुप्रिया यांना अजित पवारांचे फोटो दाखवण्यात आले त्यावेळी त्यांच्या आठवणी ताज्या झाल्या आणि सुप्रिया सुळे यांना अश्रू अनावर झाले. यादरम्यान सुप्रिया सुळे चांगल्याच भावूक झाल्या होत्या. प्रोमो पाहून नीटसं कळत नसलं तरी उत्सुकता लागून राहिली आहे की, नेमक्या कोणत्या धारदार प्रश्नाने सुप्रिया सुळे यांना हळवं केलं आहे ते जाणून घेण्याची.
आणखी वाचा – Video : आईच्या आठवणीमध्ये अभिनेता अजिंक्य देव भावुक, म्हणाला, “भरभरुन प्रेम देणारी माय…”
नेहमीप्रमाणे यंदाचा भागही दमदार असणार आहे. आता अवधूत गुप्ते यांच्या प्रश्नांना सुप्रिया सुळे कशा उत्तर देणार, हे पाहणं रंजक ठरेल.