मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीमध्ये अमृता खानविलकरचं नाव टॉपला आहे. अमृताने आजवर तिच्या नृत्याने, विविध भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. चित्रपटसृष्टीमध्ये तिने अधिकाधिक मेहनत करत स्वतःचं एक वेगळं स्थान मिळवलं. अभिनेत्री म्हणून यशाच्या शिखरावर पोहोचत असताना अमृताला तिच्या खासगी आयुष्यातही अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागला. पती हिमांशु मल्होत्राबरोबर असणारं तिचं नातंही बरंच चर्चेचा विषय ठरलं.
२०१५मध्ये अमृता व हिमांशुने लग्न केलं. पण लग्नानंतर काही काळ दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले होते. एका रिएलिटी शोच्या निमित्ताने दोघांच्या नात्यामध्ये पुन्हा गोडवा आला. पण २० वर्षांच्या ओळखीनंतरही अमृताला हिमांशुच्या बऱ्याच गोष्टी खटकतात. तसंच त्याचा घाबरट स्वभाव तिला अजिबात आवडत नाही. याचबाबत तिने आता भाष्य केलं आहे.
आणखी वाचा – लेकीच्या घटस्फोटासाठी नीना गुप्ता स्वतः जबाबदार, मसाबा गुप्ताचा मोठा खुलासा, म्हणाली, “माझ्या आईला…”
झी मराठी वाहिनीवरील ‘खुपते तिथे गुप्ते’ शोमध्ये अमृताने हजेरी लावली होती. यावेळी शोचा सुत्रसंचालक अवधुत गुप्तेने हिमांशुचा फोटो अमृताला दाखवला. तसेच “याच्याविषयी कोणती गोष्ट खटकते?” असं तिला विचारलं. यावर अमृता म्हणाली, “हिमांशु अशोक मल्होत्रा आमचे हे (पती) आहेत. मला यांच्याबाबत खूप काही गोष्टी खुपतात. पण त्या मी तुम्हाला आता सांगू शकत नाही. कारण जवळपास २० वर्ष आमची ओळख आहे”.
“आमचं नातं आहे. पण त्यांची एक गोष्ट मला खूप खुपते. ती म्हणजे मी कोणत्याच गोष्टीला घाबरत नाही. पण ते खूप घाबरतात. याआधीही तसेच होते. ते घरात मोठे आहेत. खूप लवकर त्यांचे वडील गेले. त्यामुळे घरातील सगळी जबाबदारी हिमांशु यांच्यावर आली. त्यामुळे आई, भाऊ व माझ्यासाठी ते खूप घाबरे आहेत. जर त्यांचं वागणं असं नसतं तर आमचं आयुष्य खूप वेगळं असतं असं मला वाटतं”. अमृता व हिमांशु त्यांच्या सुखी संसारामध्ये अगदी मग्न आहेत.