मैत्री हा एकमेव शब्द कानी पडताच या नात्याच्या विविध छटा आपल्या डोळ्यांसमोर दिसू लागतात. मैत्री म्हणजे सुख हे पटवून देणाऱ्या अनेक कथा आजवर मालिका, चित्रपट, नाटक, वेबसीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या समोर आल्या. पण या सगळ्यामध्ये वेगळंपण घेऊन ‘मैत्रीचा ७/१२’ वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली. ITSMAJJA ची ही वेबसीरिज सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. याचे आजवर ४० भाग प्रदर्शित झाले आहेत. आता ही सीरिज एका महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. दरम्यान एका नव्या पात्राची ‘मैत्रीचा ७/१२’मध्ये एन्ट्री झाली आहे. मराठी अभिनेत्रीची ‘मैत्रीचा ७/१२’मधील डॅशिंग एन्ट्री लक्षवेधी ठरत आहे. (aditi sarangdhar in maitricha saatbara)
‘मैत्रीचा ७/१२’मध्ये मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री आदिती सारंगधरची एन्ट्री झाली आहे. ती या सीरिजमध्ये माई हे पात्र साकारत आहे. सीरिजच्या सुरुवातीपासून नक्की माई कोण? हा प्रश्न सगळ्यांनाच होता. कथानकामध्ये दाखवण्यात आलेल्या घरातही एक रुम माईच्या नावाने आहे. या रुममध्ये कोणालाही जाण्यास सक्त मनाई आहे. त्यामुळे ही माई कोण?, तिला सगळेच का घाबरतात? असे अनेक प्रश्न होते. आता या सगळ्या प्रश्नांचं उत्तर मिळणार आहे.
आणखी वाचा – ३६व्या वर्षी सुप्रसिद्ध अभिनेत्याची आत्महत्या, राहत्या घरी मृत अवस्थेत पाहिल्यानंतर…; कुटुंब हादरलं
आदितीने अगदी हटके अंदाजात ‘मैत्रीचा ७/१२’मध्ये एन्ट्री घेतली आहे. तिची भूमिकाही अगदी हटके आहे. आदित्य, दौलत, छाया, सिद्धार्थ, संचिता, योगेश अशा सहा जीवलग मित्रांची कथा या सीरिजमध्ये दाखवण्यात आली आहे. संचिताच्या कॅफेला एक वर्ष पूर्ण होताच तिथे भेट देण्यासाठी माई येते. आता ही माई नक्की काय काम करते?, तिचा दरार इतका का? या प्रश्नांची उत्तरं शोधताना ही मुलं दिसणार आहेत.
Media One Solutions Presents & Itsmajja Original ची ही वेबसीरिज सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या सीरिजच्या दिग्दर्शनाची जबाबदारी अजय पवार यांनी सांभाळली आहे. तर निर्मितीची जबाबदारी शौरीन दत्ता यांनी सांभाळली आहे. तसेच या सीरिजच्या क्रिएटीव्ह व प्रोजेक्ट हेड अंकिता लोखंडे यांनी सांभाळली आहे. या सीरिजने आणखी पुढील भाग ‘इट्स मज्जा’च्या अधिकृत युट्यूब चॅनलवर तुम्हाला पाहता येणार आहेत.