एखादी भूमिका कलाकाराच्या नशिबी येते आणि तो त्या संधीचं सोनं करतो. त्याच भूमिकेमुळे कित्येक वर्ष प्रेक्षक त्या कलाकाराला ओळखतात. असं फार कमी कलाकारांच्या नशिबी येतं. अशाच संधीचं सोन अभिनेते देवदत्त नागे यांनी केलं. ‘जय मल्हार’ मालिकेमुळे देवदत्त यांना प्रेक्षक अक्षरशः देवच समजू लागले. बरीच वर्ष उलटूनही देवदत्त यांना याच मालिकेमुळे ओळखलं जातं. हे यश म्हणजे देवाची देण असल्याचं ते समजतात. खंडोबारायामुळे सगळं जुळून आलं असं देवदत्त यांचं मत आहे. याचबरोबरीने देवदत्त यांना गड-किल्ल्यांची प्रचंड आवड आहे. याचबाबत त्यांनी आता भाष्य केलं आहे. त्यांनी तरुण पिढीलाही योग्य ते मार्गदर्शन केलं आहे. (party on maharashtra fort)
‘मज्जाचा अड्डा’ कार्यक्रमात देवदत्त यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी गडकिल्ल्यांबाबत भाष्य केलं. त्यांना ट्रेकिंगची आवड आहे. मात्र गडकिल्ल्यांवर होणाऱ्या पार्ट्यांबाबत देवदत्त यांना प्रचंड राग आहे. ते म्हणाले, “आपल्या राजांचं प्रतिक, मराठमोळी परंपरा जपली पाहिजे म्हणून मी चंद्रकोर लावतो. भंडारा किंवा गंधही लावतो. बरीच मुलं मला झेंडे घेऊन, चंद्रकोर लावून, दाढी वाढवून दिसतात. पण मला असं वाटतं की, तुम्ही कधीतरी गडांवर जाऊन राहा ना… मला माहितेय की, गड-किल्ल्यांवर जाऊन राहण्याची परवानगी आपल्याला नाही. यामागचं कारणंही तसंच आहे”.
आणखी वाचा – Video : चूल, घरामागची पडवी अन् काजूच्या बोंडूचं भरीत, कोकणात गेलेल्या ऐश्वर्या नारकरांची खास रेसिपी
गडकिल्ल्यांवर जाऊन दारु पिण्याचं प्रमाण
पुढे ते म्हणाले, “कारण सध्या मोठ्या प्रमाणात गड-किल्ल्यांवर जाऊन ३१ डिसेंबर साजरा केला जातो. दर ३१ डिसेंबरला मी माझ्या पोलिस मित्रांबरोबर लाइव्ह जातो. दारु पिऊन गाडी चालवू नका असं सांगतो. गड-किल्ल्यांवर तर तुम्ही मुळीच दारु प्यायची नाही. असं मला काही दिसलं तर स्वतः फटकावेन. याआधीही मी जेव्हा ट्रेकिंगला जायचो तेव्हा लोकांच्या दारुच्या बाटल्या फोडल्या आहेत. गडकिल्ल्यांवर दारु प्यायला बसले असताना मी हे सगळं केलं आहे”.
आणखी वाचा – “आई खूपच काय काय करते” म्हणत मधुराणी प्रभुलकरचे संस्कार काढणारे तुम्ही कोण?
नशेच्या आहारी गेलेली पिढी
“तुम्ही मला मारा हरकत नाही पण गडकिल्ल्यांवर दारु प्यायची नाही. आताची पिढी काही अंशी चांगलीही आहे आणि काही अंशी नशेच्या आहारी गेली आहे. शिवजयंती साजरी करता चांगली गोष्ट आहे. पण कधीतरी गडकिल्ल्यांवर शिवजयंती साजरी करा. पण आता गडकिल्ल्यांवर गर्दी केली जाते. ज्या किल्ल्यांवर फारसं कोणी जात नाही तिथे जा. ज्या किल्ल्यांवर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्श झाला आहे तिथे जा. पण मित्र-मैत्रिणी किंवा पार्टी-दारु पिण्यासाठी जाऊ नका. छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आपण जात आहोत हे विचार मनात ठेऊन जा. घरी आपण गादी, मऊ उशीवर झोपतो. पण गडकिल्ल्यांवर दगडाची उशीही किती मऊ वाटते ते अनुभवायला जा”. देवदत्त यांचं गडकिल्ल्यांवर असणारं प्रेम यावेळी दिसून आलं.