69th National Film Awards Ceremony Updates in Marathi : देशातील सर्वात प्रतिष्ठित चित्रपट पुरस्कारांपैकी एक असलेल्या ६९व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळा आज दिल्ली येथे पार पडला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते यंदाच्या पुरस्कार विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. अनेक मराठी, हिंदी व दाक्षिणात्य चित्रपटांनी यंदाच्या महत्वाच्या पुरस्कारांवर नाव कोरलं. नेहमीप्रमाणे यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपटांनी आपली छाप पाडली आहे. ‘गोदावरी’ या चित्रपटासाठी दिग्दर्शक निखिल महाजन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला तर, सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार सलील कुलकर्णी यांच्या ‘एकदा काय झालं’ या चित्रपटाने पटकावला. (Saleel Kulkarni On National Award)
या पुरस्कार सोहळ्याला सलील कुलकर्णी यांनी कुटुंबासह हजेरी लावली होती. इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट करत त्यांनी एक लक्षवेधी पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी पुरस्कार घेतल्यानंतरचा कुटुंबाबरोबरचा फोटो पोस्ट केला आहे, त्याखाली कॅप्शन देत त्यांनी म्हटलंय, “हा पुरस्कार तुमचा आहे. अगदी माझ्या लहानपणापासून माझ्या पावलांना काही खुपू नये म्हणून माझ्या प्रत्येक पावलाखाली तिचा तळवा ठेवत आलेली माझी आई आणि ज्यांनी उद्याकडे बघायला कारण दिलं, ज्यांच्यामुळे प्रत्येक नवीन दिवस खऱ्या अर्थाने उजाडतो ते शुभंकर व अनन्या”.
सलील यांची ही पोस्ट पाहता त्यांनी चित्रपटाला मिळालेला पुरस्कार त्यांच्या कुटुंबियांना समर्पित केला. इतकेच नव्हे तर त्यांनी यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावल्यानंतरचा आनंद व्यक्त करत इंस्टाग्राम पोस्ट केली, “आजपर्यंत वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या, चित्रपटाच्या रिहर्सल्स(तालमी) केल्या पण ही तालीम अविस्मरणीय आहे” अशी पोस्ट शेअर केली. नुकताच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सलील कुलकर्णी यांच्या ‘एकदा काय झालं’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
‘एकदा काय झालं’ या चित्रपटात डॉ. सलील कुलकर्णी यांनी एका गोष्ट सांगणाऱ्या बाबाची कहाणी सादर केली आहे. या चित्रपटाचं लेखन,पटकथा,संवाद,संगीत व दिग्दर्शन डॉ. सलील कुलकर्णी यांनी केलं आहे. या चित्रपटात अभिनेता सुमित राघवन, मोहन आगाशे, पुष्कर श्रोत्री, अभिनेत्री उर्मिला कानिटकर, सुहास जोशी यांसारखे अनेक दिग्गज कलाकार मुख्य भूमिकेत पाहायला मिळाले.