‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील सर्वच मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत असतात. अशातच ‘ठरलं तर मग’ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. ‘ठरलं तर मग’ ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत ही अव्वल स्थानावर आहे. या मालिकेत आलेल्या अनेक टर्न अँड ट्विस्टमुळे ही मालिका रंजक बनली आहे. मालिकेतील सर्वच कलाकारांनी प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. तर मालिकेतील सायली व अर्जुन या जोडीवर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. मालिकेत रंजक वळण येत असताना नुकतीच मालिकेत एका नव्या अभिनेत्रीची एंट्री झाली आहे. मालिकेच्या समोर आलेल्या नव्या प्रोमोवरून हे समोर आलं आहे. (Tharal Tar Mag New Promo)
‘हे मन बावरे’, ‘बॉस माझी लाडाची’ या मालिकांमधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे माधवी जुवेकर. प्रोमोनुसार माधवी जुवेकरने ‘ठरलं तर मग’ मालिकेत जोगतिणीच्या रूपात एंट्री घेतली आहे. सध्या मालिकेत नवरात्रोत्सवाची धामधूम पाहायला मिळतेय. अशातच नवरात्रीनिमित्त जोगतिणीच्या रूपात माधवीची एंट्री मालिकेत झाली आहे. सुभेदारांच्या घरात जोगतीणीची एंट्री झाली आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये जोगतीण सांगते की, याठिकाणी उभा असलेला प्रत्येक मनुष्य नाटक करत आहे. त्यानंतर सायली जोगतीणीचा सत्कार करून देवीच्या पूजेला लागते. दरम्यान सायलीही येणाऱ्या अडथळ्यांना लढण्याचं बळ दे असं साकडं जोगतिणीचा आशीर्वाद घेत सांगते. यावेळी जोगतीण सायलीला खास आशीर्वाद देते.
जोगतीण सायलीला आशीर्वाद देताना म्हणते, “काळजी करू नकोस सायली. तुला एका मोठ्या अग्नीदिव्याला तोंड द्यावं लागतंय. पण, तुझ्यात एवढं पावित्र्य आहे की, कोणतीही वाईट गोष्ट तुझ्या आजूबाजूला फिरकू शकणार नाही. तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील.” यावर सायली जोगतीणीला आमचे मधूभाऊ सुटतील का? असा प्रश्न विचारत असल्याचं, नव्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
सायलीच्या या प्रश्नावर जोगतीण आता काय उत्तर देणार हे पाहणं मालिकेत रंजक ठरणार आहे. सायलीच्या इच्छेनुसार मधुभाऊंची सूटका होणार का? मधुभाऊंना शिक्षा घडवणाऱ्यांना अद्दल घडणार का? हे पाहणं मालिकेत रंजक ठरेल. तर आधीच्या प्रोमोनुसार अर्जुन आणि सायलीचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य सगळ्यांसमोर येणार का? याला सायली व अर्जुन कसे सामोरे जाणार हे पाहणं रंजक ठरेल.