मराठी चित्रपट प्रदर्शनाची तारीख जसजशी जवळ येते तसतशी निर्माते, दिग्दर्शक, कलाकार व प्रेक्षक या सगळ्यांची हुरहूर वाढू लागते. याच कारण साऱ्यांनाच माहित आहे ते म्हणजे मराठी चित्रपटांना सिनेसृष्टीत मिळणार दुय्यम स्थान. आजवर मोठमोठ्या मराठी चित्रपटांनी स्क्रीन मिळत नसल्याप्रकरणी अनेकदा संताप व्यक्त केला आहे. प्रेक्षक चित्रपट पाहायला येण्यापेक्षा तो चित्रपट चित्रपटगृहात प्रक्षेपित होतंच नाही यासाठी अनेक निर्मात्यांनी, दिग्दर्शकांनी भाष्य केलं आहे. (Madhugandha Kulkarni Replied to onlooker)
अशातच काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘आत्मपॅम्फ्लेट’ या चित्रपटाला स्क्रीन न मिळाल्याच्या संकटाला सामोरं जावं लागलं. चित्रपटाची कथा आशयघन असून हा चित्रपट सहकुटुंब पाहता येण्यासारखा होता, असे असले तरी प्रेक्षकांना हा सिनेमा पाहता आला नाही याची खंत थेट चाहत्यांनीच मांडली. या चित्रपटाच्या निर्मात्या मधुगंधा कुलकर्णी यांनी नुकताच एक फोटो सोशल मीडियावरून पोस्ट केला. दरम्यान या फोटोवरील कमेंटने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
चाहत्याने केलेली कमेंट पाहता हा चाहता पुण्याचा असल्याचा अंदाज आहे. उत्तम सिनेमांना स्क्रीन न मिळणे हा मुद्दा उचलून त्याने हा प्रश्न केला आहे. उत्तम चित्रपट हे केवळ पुण्यात का पाहायला मिळत नाही असा सवाल या चाहत्याने केला आहे. मुंबई, पुणे सारख्या मेट्रो सिटीमध्ये मराठी चित्रपटांना मिळणार दुय्यम स्थान आता साऱ्यांनाच खटकू लागलं आहे.
अभिनेत्री, निर्मात्या मधुगंधा यांच्या पोस्टवर, “उत्तम सिनेमाची हवा ही पुण्याच्या बाहेर का नसते? तुमचा चित्रपट मुंबईमध्ये पाहायचा म्हणजे गनिमी कावा. थिएटर शोधा, मग विचित्र वेळेला असलेल्या शोची तिकिटं काढा, त्या वेळेत पोहचायला कष्ट घ्या. आणि पोहोचल्यावर शोला कमी गर्दी असल्यामुळे तो रद्द नाही होणार यासाठी स्वामी समर्थांना साकडं घाला. या सर्वांमधून वाचलात तर चित्रपट पाहायचा”, असा प्रश्न चाहत्याने मुग्धा यांना केला असता, यावर एक निर्माती व प्रेक्षक, अभिनेत्री म्हणून प्रतिक्रिया देत मधुगंधा यांनी म्हटलं की, “सर आम्हाला या सगळ्याचा खूप त्रास होतो पण आमच्या हातात काही नाही. तरी क्षमा करा”.