अभिनेते तुषार दळवी आणि अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांची मुख्य भूमिका असलेली ‘लक्ष्मीनिवास’ ही मालिका लवकरच झी मराठीवर सुरु होणार आहे. काही दिवसांपूर्वी या मालिकेचा प्रोमो शेअर करण्यात आला. या मालिकेचा नवा प्रोमो पाहून कोणती जुनी मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार? याची उत्सुकता लागून राहिली होती. अशातच ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका दोन वर्षांनी प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर झाल्या होत्या. अखेर या चर्चा आता खऱ्या ठरताना दिसत आहेत. ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ फेम नेत्रा म्हणजेच तितीक्षा तावडेच्या एका पोस्टने याबद्दलच्या चर्चांना आणखी उधाण आले आहे. (Satvya Mulichi Satavi Mulgi serial will be off air)
नेत्रा फेम अभिनेत्री तितीक्षा तावडे ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. सोशल मीडियावर ती आपले अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. तसंच मालिकेच्या काही अपडेट्सही देत असते. अशातच तिने शेअर केलेला एक व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. अभिनेत्रीने नेत्राच्या लूकमधील एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि या व्हिडीओखाली तिने “निरोप घेणे कठीण आहे” असं म्हटलं आहे. सोशल मीडियावर सक्रीय असण्याबरोबरच तितीक्षाचं युट्यूब चॅनेलही आहे, यावर ती तिच्या दैनंदीन जीवनातील काही अपडेट्स आणि खास क्षण शेअर करत असते.
आणखी वाचा – अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’चा वादाचा भोवरा, चित्रपटगृहात आढळला संशयास्पद मृतदेह, नेमकं प्रकरण काय?
नुकताच तिने ऐश्वर्या नारकरांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त खास व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये तिने ऐश्वर्या नारकरांच्या सेटवरील वाढदिवसाचे खास सेलिब्रेशन अआय सरप्राइजची झलक शेअर केली होती. याच व्हिडीओमध्ये तिने मालिकेचे शेवटचे आऊटडोर शूटिंग असल्याचे म्हटलं होतं. यामुळेही मालिकेच्या निरोपांच्या चर्चा सोशल मीडियावर झाल्या होत्या. अर्थात मालिका बंद होणार असल्याच्या चर्चांवर अद्याप वाहिनीकडून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. पण मालिका बंद होणार असल्याच्या चर्चांमुळे चाहते काहीसे नाराज झाले आहेत.
‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका मागील दोन वर्षांपासून टीआरपीच्या शर्यतीमध्ये आहेत. झी मराठी वाहिनीवरील टीआरपीमध्ये अव्वल असणाऱ्या मालिकेमध्ये ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका टॉपला आहे. मालिकेची आगळीवेगळी कथा व कलाकारांचा सशक्त अभिनय यामुळे गेली दोन वर्षे या मालिकेने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले. मात्र अखेर दोन वर्षांनी ही मालिका आता निरोप घेणार आहे.