अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा-२’ चित्रपट प्रदर्शनापासून चांगलाच चर्चेत आहे. हा चित्रपट तिकीटबारीवर दमदार कामगिरी करत आहे. अनेक चित्रपटांना ‘पुष्पा-२’ने मागे टाकले आहे. तसंच हा चित्रपट अनेकांची वाहवा मिळवत आहे. असं असलं तरी चित्रपटाच्या सुरुवातीपासून अनेक वाद होताना पाहायला मिळत आहेत. प्रीमियरला झालेल्या महिला चाहत्याच्या मृत्यूने या चित्रपटाच्या शुभारंभाच्याच दिवशी गालबोट लागले. त्यानंतर करणी सेनेने या चित्रपटाच्या निर्मात्यांना घरात घुसून मारण्याची धमकी दिली. (Pushpa 2 movie man death in the theatre)
अशातच आता या चित्रपटाबाबत आणखी एक घटना समोर येत आहे ती म्हणजे आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील रायदुर्गम शहरातून एका मोठ्या अपघाताचे वृत्त येत आहे. शहरातील एका चित्रपटगृहात ‘पुष्पा २’ प्रदर्शनादरम्यान एका व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. चित्रपटगृहात बसलेले लोक चित्रपटाचा आनंद लुटत असताना ही घटना उघडकीस आली आणि या व्यक्तीच्या मृत्यूची बातमी समोर येताच चित्रपटगृहात उपस्थितांमध्ये एकच खळबळ उडाली. ही घटना मंगळवार, १० डिसेंबर रोजी सायंकाळची आहे.
आणखी वाचा – मराठी कलाकारांची लगीनघाई! ‘तुला शिकवीन…’ फेम अभिनेत्रीही अडकणार विवाहबंधनात, पार पडला मेहंदी सोहळा
आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील एका चित्रपटगृहात सापडलेल्या व्यक्तीच्या मृतदेहामुळे परिसरात खळबळ उडाली. मध्यनप्पा असे मृताचे नाव आहे. मध्यनप्पा हे उदेगोलम गावचे रहिवासी होते आणि त्यांना चार मुले आहेत. पोलिसांनी पीटीआयला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ३५ वर्षीय व्यक्तीला दारूचे व्यसन होते आणि तो चित्रपटगृहात पोहोचण्यापूर्वीच दारूच्या नशेत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यनप्पाने चित्रपटादरम्यान जास्त दारू प्यायली होती, त्यानंतर तो मृत आढळून आला.
आणखी वाचा – सुनील पालनंतर आणखी एका सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचे अपहरण, कार्यक्रमासाठी बोलावलं अन्…; नेमकं काय झालं?
ही घटना संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली, जेव्हा तेथील एका स्वच्छता कर्मचाऱ्याने त्या व्यक्तीला संशयास्पद अवस्थेत पाहिले. रायदुर्गमचे पोलीस उपअधीक्षक रवी बाबू यांनी सांगितले की, सध्या मृत्यूचे नेमके कारण कळू शकलेले नाही. या घटनेबाबत पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम १९४ अन्वये गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. जेव्हा त्या व्यक्तीचे कुटुंब चित्रपटगृहात पोहोचले तेव्हा त्या माणसाचे निधन झाले होते.