‘मूर्ती लहान, कीर्ती महान’ असणारा छोटा पुढारी अर्थात घन:श्याम दरवडे ‘बिग बॉस मराठी’च्या घरामधून बाहेर पडला आहे. आपल्या बोलण्याच्या शैलीमुळे प्रसिद्ध झालेल्या घन:श्यामने ‘बिग बॉस मराठी’च्या घरातही चांगलाच धमाका केला. संपूर्ण महाराष्ट्राच्या मनामध्ये राज्य करण्याचा प्रयत्न घन:श्यामने केला. गर्दी जमवणारा, सभा गाजवणारा, व्यासपीठावरुन भल्याभल्यांना घाम फोडणाऱ्या छोट्या पुढारीची बिग बॉस मराठीच्या घरातही चांगलीच हवा होती. त्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. (Chhota Pudhari bought land)
मात्र ‘बिग बॉस’च्या शेवटच्या दिवसांत घन:श्यामचा ‘बिग बॉस’च्या घरातील प्रवास संपला. शो सोडल्यानंतर बाहेर पडताना घन:श्याम काही रक्कम घेऊन बाहेर पडला होता. या पैशांचे त्याने काय केलं असा प्रश्न त्याचे अनेक चाहते त्याला विचारत होते आणि अखेर यावर त्याने उत्तर दिलं आहे. घन:श्यामने त्याच्या युट्यूब चॅनेलवर यासंबंधित एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि यात त्याने ‘बिग बॉस’मधील पैशांनी जागा विकत घेतल्याचे सांगितले आहे .
या व्हिडीओमध्ये त्याने असं म्हटलं आहे की, “दिवाळीत लक्ष्मीपूजनच्या दिवशी लक्ष्मीपूजन केलं होतं. मात्र खऱ्या अर्थाने ती आपली झाली आहे. मी, आई आणि अण्णा खरेदीसाठी गेलो होतो. प्रत्येकाने बिग बॉसचे पैसे आपापल्या इच्छेने गुंतवले. कुणी दागदागिने केले, कुणी जागा घेतली तर कुणी घर बांधलं. अनेकांना प्रश्न होता मी त्या पैशांचं काय केलं? आज मी सर्वांना याबाबतची आनंदाची बातमी सांगतो. आपण त्या पैशांची जागा घेतली आहे”.
आणखी वाचा – अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’चा वादाचा भोवरा, चित्रपटगृहात आढळला संशयास्पद मृतदेह, नेमकं प्रकरण काय?
यानंतर त्याने आपल्या आईची प्रतिक्रिया विचारली. यावर त्याच्या आईने असं म्हटलं की, “याबद्दल मला खूपच छान वाटत आहे. नवीन जागा घेऊन आम्ही ती त्याच्याच नावावर केली. तो मला म्हणाला होता की, आई तुझ्या नावावर ही जागा घेऊ. पण, मी त्याला सांगितलं की नाही. ही तुझी कमाई आहे, त्यामुळे तुझ्याच नावावर घ्यायची. आम्हाला वाटलं नव्हतं तो एवढे दिवस घरात टिकेल. मोबाइलशिवाय तो इतके दिवस वगैरे राहील… पण, तो राहिला आणि ही त्याच्या कष्टाची कमाई आहे, त्यामुळे ही जागा त्याचीच आहे”.
आणखी वाचा – मराठी कलाकारांची लगीनघाई! ‘तुला शिकवीन…’ फेम अभिनेत्रीही अडकणार विवाहबंधनात, पार पडला मेहंदी सोहळा
यापुढे त्याच्या वडिलांनी याबद्दल असं म्हटलं की, “बिग बॉसची तुझी ही कमाई आहे. ती इकडे तिकडे कुठे जाण्यापेक्षा योग्य कारणी लागली. त्याच्याबद्दल मला खूप आनंद आहे. लोकांची मुलं गुटखा वगैरे खाऊन थुंकुन टाकतात. पण याने असं काही न करता, माझ्यादेखत काही तरी स्वत:के कर्तुत्व केलं आणि मला याचा आनंदच आहे”. दरम्यान, या व्हिडीओखाली अनेकांनी त्याला अभिनंदन व शुभेच्छा अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. शिवाय अनेकांनी त्याच्या या कामगरीचे कौतुकही केलं आहे.