बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा नुकतीच तिच्या लग्नामुळे चर्चेत आली. गेले काही दिवस तिच्या लग्नाबद्दलच्या अनेक चर्चा सोशल मीडियावर रंगल्या होत्या आणि अखेर ती बॉयफ्रेंड झहीर इक्बालबरोबर विवाहबंधनात अडकली आहे. मुंबईत अगदी थाटामाटात या जोडप्याचा विवाहसोहळा संपन्न झाला आहे. मुंबईत सोनाक्षीच्या घरी स्पेशल मॅरेज ॲक्टनुसार दोघांनी एकमेकांबरोबर लग्नगाठ बांधली. लग्नाची नोंदणी करताना सोनाक्षी व झहीरचे कुटुंबीय उपस्थित होते. गेल्या महिन्यात २३ जून रोजी त्यांचे लग्न पार पडले होते. नोंदणीकृत लग्नानंतर, त्याचदिवशी संध्याकाळी एक रिसेप्शन पार्टी आयोजित करण्यात आली होती. जवळपास सात वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न केलं. मात्र झहीरचा सोनाक्षीला पळवून नेत लग्न करण्याचा विचार होता.
झहीरने अलीकडेच एका मुलाखतीत खुलासा केला की, त्याचे लग्नाचे नियोजन सोनाक्षीपेक्षा खूपच वेगळे होते. त्याला देशातून पळून जाऊन लग्न करायचं होतं. सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी ‘गलाट्टा इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या लग्नाच्या नियोजनाबद्दल खुलासा केला. सोनाक्षी म्हणाली की, तिला कायम घरातील सर्व कुटुंबियांबरोबर लग्न करायचे स्वप्न होते. पण नंतर झहीरने तिला अडवले आणि असं म्हटलं की, “मला पळून जायचे होते. देशाबाहेर कुठेतरी जाणे, लग्न करून परत येणे, पण मला कळले की, असे लग्न भारतात वैध नाही”.
तसेच सोनाक्षीने सांगितले की, तिला एक छोटेसे लग्न करायचे होते. अभिनेत्रीने सांगितले की, तिला तिच्या लग्नात नातेवाईक आणि मित्रांनी उपस्थित राहावं असं नेहमीच वाटत होतं. लग्नात आपल्या आयुष्याचा एक भाग असलेल्या सर्व लोकांना सामील करून घ्यायचे होते, असेही ती म्हणाली.
दरम्यान, ७ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर सोनाक्षी व झहीरने गेल्या महिन्यात लग्न केले. सोनाक्षीच्या अपार्टमेंटमध्ये हा विवाहसोहळा पार पडला, ज्यामध्ये कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र उपस्थित होते. नोंदणी पद्धतीने त्यांचा हा विवाहसोहळा पार पडला होता.