‘बाप’ हा प्रत्येक मुलाच्या आयुष्यातला सुपरहिरो असतो. त्या सुपरहिरोचं अस्तित्व हे प्रत्येक मुलासाठी महत्त्वाचं असतं. पण ते अस्तित्वचं एकेदिवशी नाहीसं झालं तर कोणताही माणूस अचानक कोलमडून पडतो. असंच काहीसं ‘बिग बॉस मराठी’ फेम जय दुधाणेबरोबर झालं. ‘बिग बॉस मराठी’मधून घराघरांत लोकप्रिय झालेला अभिनेता जय दुधाणे व त्याच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला. जयचे वडील अनिल दुधाणे यांचे गेल्या महिन्यात मध्यरात्री कार्डियाक अरेस्टमुळे निधन झाले. जयने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत वडिलांच्या निधनाची बातमी दिली होती.
जयने सोशल मीडियावर वडिलांबद्दल खास पोस्ट करत ‘मी माझा सुपरहिरो गमावला’ असल्याची भावूक प्रतिक्रिया व्यक्त केली होती. या पोस्टमध्ये जयने आपल्या भावना व्यक्त करत “मी हे शेअर करेन असे कधी वाटले नव्हते. २४ जूनच्या मध्यरात्री कार्डियाक अरेस्टमुळे मी माझा सुपरहिरो गमावला. ते फक्त आमच्या कुटुंबासाठीच नाही तर त्यांच्या ओळखीच्या प्रत्येकासाठी एक महत्त्वाची व्यक्ती होते” असं म्हटलं होतं. अशातच वडिलांच्या निधनानंतर जयने पाहिल्यांदाच त्याच्या बाबांबद्दलच्या भावणा व्यक्त केल्या आहेत.
आणखी वाचा – Video : हेचि दान देगा देवा! विठ्ठल भक्तीत रमले आदेश बांदेकर, अन्नदानही केलं अन्…; साधेपणाचं होतंय कौतुक
जयने नुकताच ‘इट्स मज्जा’बरोबर संवाद साधला. या संवादात त्याने असं म्हटलं की, “२३ जूनला मी माझे बाबा गमावले. पण तेव्हापासून मला सतत असं वाटत आहे की, एक आधुनिक शक्ती माझ्यात आली आहे असं मला वाटत आहे. मी त्यांना खूप लवकर गमावलं. ते फक्त ५४ वर्षांचे होते. पण ते माझ्याबरोबर आहेत असं कायम वाटत राहतं. मी कोणतेही काम करत असताना मला सतत एक आवाज येत असल्याचे मला वाटतं. तर आता तेच माझ्यासाठी देव आहेत. हे सगळं माझ्यासाठी खूपच कठीण आहे. पण आई व बहिणीकडे बघून मी ठरवलं की, आपल्याला सावरायला हवं”.
यापुढे त्याने असं म्हटलं की, “माझ्या बाबांनी मला लहानपणापासूनच आर्थिकदृष्ट्या सक्षम केलं होतं. आजच्या दिवसासाठीच त्यांनी ते करुन ठेवलं होतं असं मला वाटतं. कारण अशी वेळ कधीच कुणाला सांगून येत नाही. ते जायच्या आदल्या दिवशी माझ्याबरोबर बोलत होते. हसत-खेळत होते. उद्या काय करायचं हे बोलत होतो. पण दुसऱ्या दिवशी ते अचानक गेले आणि तेव्हापासून मी आजपर्यंत त्यांचा आवाज ऐकलाच नाही. त्यामुळे आता माझी आई मला फोन करते तेव्हा मी तिच्याशी बाकीची कामं सोडून बोलतो. जे मी आधी करत नव्हतो”. दरम्यान, यापुढे जयने वडिलांच्या निधनानंतर त्यांचा व्यवसाय सांभाळत असल्याचे म्हटले. तसंच बाबा किती तणावाखाली काम करत होते हे मला आता कळत आहे अशा भावनाही त्याने व्यक्त केल्या.